लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : मांगले (ता. शिराळा) परिसराला वादळी वारे, विजांचे थैमान व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दीड तास झोडपले. शेतात सर्वत्र पाणी साठले होते. अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे व घरांचे छत उडून गेले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शिवाय विजेचे खांब पडल्याने मांगले-कांदे रस्ता बंद झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून मांगले परिसराला पाऊस हुलकावणी देत होता. गुरुवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून हवेत उष्णता होती. सायंकाळी सव्वापाच वाजता वादळी वारे, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर विजांचे थैमान सुरू होते. दीड तासानंतर पाऊस सुरूच होता. हा पाऊस खरीप हंगामाच्या मशागतीसाठी व उभ्या ऊस पिकास उपयुक्त आहे.
फोटो - मांगले येथील तालुका क्रीडांगणावर साठलेले पाणी तर दुसरे छायाचित्र दुकानांवरील उडालेल्या छपराचे.