सांगली : विकासकामे, जनसंपर्क, सामाजिक उपक्रम अशा मार्गाने होत असलेली ग्रामीण राजकारणाची वाटचाल आता अंधश्रद्धेच्या कवेत विसावत असल्याचे धक्कादायक चित्र सांगली जिल्ह्यात दिसून आले आहे. चुडेखिंडी (ता. कवठेमहांकाळ) येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील यशासाठी काही उमेदवारांनी लिंबू पुरले, तर नव्याने सत्तेत आलेल्या एका उमेदवाराने ३ हजार लिंबू अंथरूण त्यावरून गाडी चालवली.कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील बामणी गावात चार परप्रांतीय साधूंना उमेदवारांनी बोलावल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. सांगली जिल्ह्यातही भानामती, करणीसारखे प्रकार उजेडात येत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयासाठी उमेदवारांनी राजरोसपणे अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे दिसून येत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी इथे या पुढील प्रकार समोर आला. निवडणूक जिंकावी यासाठी काही माजी सत्ताधारी उमेदवारांनी लिंबू मंतरून ते जमिनीत पुरले होते. त्याची चर्चाही रंगली होती. या गावात सत्तांतर झाले आणि एका सत्ताधारी उमेदवाराने त्याला प्रत्युत्तर म्हणून चक्क तीन हजार लिंबू मंतरून उतारा टाकला. अंथरलेल्या या लिंबूवरुन गाडी चालवून जल्लोष करण्यात आला. निवडून आलेल्या आणखी एका उमेदवारानेही मिरवणुकीच्या वाटेवर तीन हजार लिंबूचा उतारा टाकला.
समृद्धी आली, पण अंधश्रद्धा फुलली
सांगली जिल्ह्यातील चुडेखिंडी गाव हे पूर्वी कायम दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. उन्हाळ्यात सर्वांत अगोदर या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जलयुक्त शिवारमधून मोठ्या प्रमाणात कामे झाली आणि हे गाव पाण्याच्या दृष्टिकोनातून समृद्ध झाले. समृद्धी आली, पण अंधश्रद्धा फुलली, अशी स्थिती या गावातील अशा वाढत्या प्रकारांमधून दिसत आहे.