संजयनगर : सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी अतिशय कठीण व आव्हानात्मक मानला जाणारा लिंगाणा किल्ला सांगलीची दिव्यांग गिर्यारोहक काजल कांबळे हिने सर केला. लिंगाणा सर करणारी ती पहिलीच दिव्यांग मुलगी ठरली आहे.लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. रायगड स्वराज्याचे राजगृह, तर लिंगाणा स्वराज्याचे कारागृह असे म्हटले जाते. बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे. आकाशात उंच गेलेला शिवलिंगासारखा हा सुळका आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट ही पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या साहाय्यानेच चढता येते.काजलच्या मोहिमेची सुरुवात मोहरी (जि. पुणे) गावापासून झाली. दोन तासांची पायपीट करून बोराट्याची नाळ उतार होऊन उजव्या बाजूला ट्रॅवर्स मारल्यावर रायलिंग आणि लिंगाण्याच्या खिंडीत पोहोचता येते. प्रथम १२ फूट चिमणीवर चढाईनंतर उजव्या बाजूला गुहा, तर डाव्या बाजूला पाण्याचे टाके आहे. येथून पुढे टप्प्याटप्प्याने तीन सरळसोट ९० अंशांतील कातळकडे चढावे लागतात. त्यानंतर लिंगाण्याचे शिखर गाठता येते. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा आणि दोन्ही बाजूंना खोल दरी असलेला तब्बल १००० फूट निसरडा खडतर मार्ग आहे. या मोहिमेत काजलला जॉकी साळुंखे, भारत वडमारे, लव थोरे यांनी मार्गदर्शन केले. तिच्यासोबत गायत्री फडके, प्रीती फडके, नयना बोराडे, माधवी पवार, सचिन मराठे, प्रथमेश, अभिषेक साळवी, अशिष कुमार यांनी मोहीम पूर्ण केली.
महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहकाने सर केला लिंगाणा, सांगलीच्या काजल कांबळेने फडकविला तिरंगा
By संतोष भिसे | Published: January 05, 2024 3:37 PM