आष्टा : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील शारदाताई शिवाजी चांदणे (वय ६५) यांनी सुनेच्या छळास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मुलगा नंदकुमार चांदणे याने आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार, दि. ३० रोजी घडली. बहाद्दूरवाडी येथील नंदकुमार चांदणे हा वाहनचालक म्हणून काम करतो. त्याचा २००३ मध्ये सावर्डे (ता. हातकणंगले) येथील मनीषा मानसिंग घोंगडे हिच्याशी विवाह झाला. त्यांना पवन व प्रणाली अशी दोन मुले आहेत. २००५ मध्ये नंदकुमार पत्नीसह व्यवसायासाठी मुंबईला गेला. मात्र तिचे वागणे न पटल्याने काही दिवसातच ते परत आले. त्यानंतर नंदकुमारने पत्नीला माहेरी सोडले व स्वत: आई, मोठ्या भावासह आष्टा येथे राहू लागला. २०१० मध्ये मनीषाने त्याच्यावर पोटगीसाठी दावा दाखल केला, मात्र २०१३ मध्ये दोघांमध्ये समेट होऊन दावा मागे घेऊन ते एकत्र राहू लागले. मात्र त्यानंतरही सासू-सुनेमध्ये वाद सुरूच होते. २५ जानेवारी रोजीही त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर शारदाताई रागा-रागाने घरातून बाहेर पडल्या. यावेळी नंदकुमार घरी नव्हता. तो आल्यानंतर भावजयीने त्याला भांडणाची माहिती दिली. शारतादाई आष्ट्याला तिच्या बहिणीकडे गेली आहे, पोलिसात तक्रार देणार आहे, बरे-वाईट करून घेणार असल्याचेही बडबडत होती. पुन्हा २६ जानेवारीस शारदाताई पुन्हा बहाद्दूरवाडीस आल्या. सुनेचा त्रास होत असल्याचे शेजाऱ्यांना सांगत होत्या. तेथून मिणचे (ता. हातकणंगले) येथे भावाकडे जाते, असे सांगून त्या निघून गेल्या. वडाप जीपमधून त्या मिणचेकडे जात असताना तांदुळवाडीजवळ त्यांना चक्कर आली. हा प्रकार लक्षात येताच वडापचालकाने त्यांना घरी आणून सोडले. त्यानंतर त्यांना उलटी झाली. विषारी द्रव्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ३० रोजी त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
सुनेच्या त्रासाने सासूची आत्महत्या
By admin | Published: February 02, 2016 1:22 AM