लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : माणसाच्या अतिहव्यासामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. साहित्यिकांनी सामाजिक बांधीलकी म्हणून निसर्गाविषयी भरभरून लेखन करावे, समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती करावी, असे प्रतिपादन कविसंमेलनाध्यक्ष सुभाष कवडे यांनी केले. ब्रह्मनाळ, ता.पलूस येथे आनंदमूर्ती संस्थान आणि आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या वतीने आयोजित आभाळमाया निसर्ग काव्यसंमेलनात सुभाष कवडे बोलत होते.
कवी सुभाष कवडे यांनी महापूर सोसुनिया या कवितेतून आपण जे निसर्गाला दिले ते निसर्गाने महापुरातून परत दिल्याची भावना व्यक्त केली. ‘आत्महत्यांचा विचार पाखरांना नाही पटत’ या शब्दात दयासागर बन्ने यांनी निसर्गाच्या हायकू सादर केल्या. तर, नदी आणि माती दोघी सख्या मैत्रिणी या वर्षा चौगुले यांच्या कवितेतेने नदी आणि मातीच्या नात्याचे पदर उलगडले. यास्मिन शेख यांनी ‘निसर्ग माता’ कवितेतून भरभरून देणाऱ्या निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. मनीषा पाटील ‘पैस’ कवितेतून वेलींनी टाकली कात, केलीही बात, फुलांच्या संगे, ‘निसर्ग आणि कवी यांचं प्रेम’ या अभिजित पाटील यांनी आपल्या कवितेतून सौंदर्यसंपन्न निसर्गाचे वर्णन करणारी रचना सादर केली. ‘बघ सोनेरी सुरव्यानं, ओटी कृष्णेची भरली’ या कवितेतून संदीप नाझरे यांनी पशुपक्ष्यांनी गजबजलेल्या कृष्णाकाठच्या रम्य सायंकाळचे चित्रण डोळ्यासमोर उभे केले.
धनश्री खाडे यांनी, ‘मेघ बरसतो, निसर्ग बहरतो, थेंबाथेंबातून हिरवाई पसरवतो’ ही पावसानंतर निसर्गात होणारे बदल टिपणारी कविता सादर केली.नामदेव जाधव, वंदना हुलबत्ते या निमंत्रित कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.
यावेळी कवी बाबासाहेब पाटील ‘कोरोना’, रंजना गावडे, प्रज्ञा म्हेत्रे, शिखा मुल्ला, सुवर्णा चव्हाण यांच्यासह नवोदित कवयित्री सुप्रिया राजोबा यांनी निसर्ग कविता सादर केल्या.
यावेळी उद्योजक गिरीश चितळे, राजारामबापू बँकेचे संचालक श्यामराव पाटील, आनंदमूर्ती संस्थानचे विलास गोसावी, बाळासाहेब पाटील, डॉ. विकास गोसावी, सुरेंद्र वाळवेकर, अमोल पाटील, एम.एस. रजपूत, संदीप राजोबा, मुस्तफा मुजावर, माया गडदे उपस्थित होते.
फोटो - ब्रह्मनाळ येथे कविसंमेलनात मार्गदर्शन करताना सुभाष कवडे, शेजारी प्रमोद चौगुले, अभिजित पाटील, वर्षा चौगुले आदी.