सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथे एक दिवसाच्या पुरुष जातीच्या अर्भकास जिवंत पुरुन ठार मारण्याचा प्रयत्न झाला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आज (सोमवारी) सकाळी पावणेआठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अर्भकास खड्डयातून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्याला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गळवेवाडीतील गावठाणाबाहेर एक ग्रामस्थ सकाळी प्रातर्विधीसाठी गेला होता. त्यावेळी तेथील एका शेतात अर्भकाचे पाय मातीच्या ढिगाऱ्यात दिसून आले. या ग्रामस्थाने पुढे जाऊन पाहिले असता लहान मुलाचे हे पाय असल्याचे दिसून आले. त्याने आटपाडी पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. पोलीस तातडीने दाखल झाले. अर्भकाच्या अंगावर मातीचा ढिगारा होता. तो ढिगारा बाजूला काढण्यात आला. त्यावेळी नवजात पुरुष जातीचे अर्भक असल्याचे दिसून आले. अर्भकास बाहेर काढण्यात आले. वितभर खड्डा खोदून अर्भकास जिवंत पुरण्यात आले होते. दैव बलवत्तर म्हणून या अर्भकाचे प्राण वाचले. पोलिसांनी त्याला उपचारार्थ सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी या अर्भकास पुरले असावे, असा संशय आहे. संशयित परिसरातील असावेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध अर्भकास जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
जिवंत अर्भकास शेतामध्ये पुरले
By admin | Published: September 30, 2014 12:13 AM