संतोष भिसेसांगली : भोंग्याचा आवाज काहींसाठी अस्पृश ठरत असला तरी खेराडे वांगी (ता. कडेगाव) ग्रामस्थांसाठी मात्र जीवनविद्येची आस जागविणारा ठरला आहे. शाळेतील सायरन (भोंगा) वाजताच घराघरातील टीव्ही बंद होतात आणि मुले अभ्यासाला बसतात. दररोज सायंकाळी सात ते आठ दरम्यान टीव्हीवरील चवचाल मालिकांना विश्रांती मिळते, सरस्वतीची आराधना सुरू होते.कडेगाव तालुक्यात तीन-चार हजार लोकवस्तीच्या खेराडे वांगीने भोंग्यांच्या भोंदूगिरीला अशी चपराक दिली आहे. भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषण होते म्हणणाऱ्यांना, हाच आवाज मुलांना विद्येच्या मार्गावर नेऊन सोडतो हे दाखवून दिले आहे. जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या शाळेत १७२ मुले शिकतात. मुख्याध्यापक जनार्दन ढाणे यांच्यासह सहा शिक्षक अध्यापन करतात. घरात मुलांना अभ्यासाला शिस्त लावण्यासाठी भोंगा वाजविण्याची कल्पना ग्रामस्थांच्या बैठकीत सुचली, नुकतीच तिची अंमलबजावणीही सुरू झाली.
महामार्गामुळे बसविला भोंगाही प्राथमिक केंद्र शाळा गुहागर-विजापूर महामार्गाला अगदी खेटून आहे. बेभान धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीतून शाळेत येणे म्हणजे जीवाची कसरतच. यावर ग्रामस्थांनी मार्ग काढला. शाळेत भोंगा बसविला. सकाळी शाळेच्या वेळेपूर्वी १५ मिनिटे वाजविला जातो. त्यासरशी पालक मुलांना शाळेत आणून सोडतात. शाळा सुटण्यापूर्वी १५ मिनिटे पुन्हा भोंगा वाजतो. त्यावेळी मुलांना घेऊन जातात. रस्ते सुरक्षिततेवरुन भोंग्यांची कल्पना अंमलात आली होती, तिचा वापर आता अभ्यासासाठीही होत आहे.
खेराडे वांगी शाळेतील भोंग्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. घराघरातील टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासाला बसविण्याची संकल्पना प्रेरणादायी आहे. - जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
शाळेतील भोंग्याची संकल्पना म्हणजे शिक्षक व ग्रामस्थांमधील सुसंवाद आणि शिक्षणाप्रति घेतलेल्या ध्यासाचे प्रतीक आहे. राज्यभरात अनेक जिल्ह्यांत फिरलो; पण अशी संकल्पना फक्त खेराडे वांगी येथेच पाहायला मिळाली. कोणताही गाजावाजा न करता गावात वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना राबविल्या जात असल्याचे पाहून आनंद झाला. - राजलक्ष्मी नायर, राज्य प्रमुख, युनिसेफ (पोषण)