सांगली : केवळ आधारकार्डवर दोन टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येत असल्याचा संदेश मोबाईलवर आला असेल तर सावधान! यात दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास आपली पूर्ण माहिती घेऊन फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. ‘प्रधानमंत्री आधारकार्ड लोन योजना’ नावाने येणाऱ्या या मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आमिषाला बळी पडून लाखो रूपयांवर पाणी सोडावे लागल्याची अनेक उदाहरणे असतानाच, गेल्या आठवड्यापासून आता अनेकांच्या मोबाईलवर एक संदेश येत आहे. या संदेशात प्रधानमंत्री आधारकार्ड योजनेतून दोन टक्के व्याजाने कर्ज देण्यात येणार असून, त्यातील क्रमांकावर कॉल करण्याची विनंती केली जात आहे.
केवळ आधारकार्ड देऊन कर्ज देण्याची केंद्र सरकारची काेणतीही योजना नाही. शिवाय इतका कमी व्याजदर कोणत्याही योजनेला नसतो. याबाबत अधिक माहिती घेतली असता, ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या अवलंबले जात आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएमची माहिती घेणे, ओटीपी मागून पैसे लांबविण्याचे प्रकार घडत आहेत. आता यात भर पडली असून, संबंधित संदेशामधील क्रमांकावर काॅल केल्यास आपली कागदपत्रे मागून तसेच बँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे.
अनेकांना या संदेशासह एक लिंक येत असून, ती उघडल्यास आपल्या मोबाईलमधील आणि इतर सर्व माहिती लीक हाेण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अशा कोणत्याही लिंक अथवा अनोळखी क्रमांकावर माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
चौकट
सध्या अनेकांना येत असलेल्या संदेशांमध्ये ‘प्रधानमंत्री योजना हर प्रकारका लोन, एक टक्का ब्याज’, ‘प्रधानमंत्री आधारकार्डसे लोन योजना दोन टक्का ब्याज, ४० टक्का छूट’ अशाप्रकारचे संदेश आणि खाली एक क्रमांक येत आहे. या क्रमांकावर वैयक्तिक माहिती घेतली जात असून, काही रक्कमही प्रोसेसिंग फी म्हणून भरण्यास सांगितले जात आहे.
कोट
फसवणूक करण्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. आता येत असलेले असे संदेशही त्यातलाच प्रकार असल्याने नागरिकांनी त्याला कोणताही प्रतिसाद देऊ नये.
- संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे