सांगली : कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचे चटके सोसून पुन्हा पूर्वपदावर येऊ पाहणाऱ्या उद्योेजकांना आता पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चेनेही धडकी भरत आहे. पुन्हा लॉकडाऊन झाले तर उद्योगांचा डाेलारा कोसळेल, अशी भावना उद्योजकांमधून व्यक्त होत आहे.
कोरोना काळात गतवर्षात दीर्घकाळ उद्योग बंद राहिले. जेव्हा उद्योग सुरू झाले तेव्हासुद्धा अनेक महिने कामगारांची उपलब्धता, कच्च्या मालाचा पुरवठा, उत्पादित मालाला बाजारपेठ, अर्थसहाय्य अशा अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. गेल्या चार महिन्यांतच उद्योग क्षेत्रात थोडी सुधारणा होऊन चक्र गतीने फिरू लागले आहे. या काळात कच्चा माल, वाहतूक, कर व अन्य खर्च कित्येक पटीने वाढले. त्यामुळे उत्पादित मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. आता लॉकडाऊन झाला, तर मोठी आर्थिक गुंतवणूक करून तयार केलेला माल पडून राहून कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर अन्य खर्चही करावे लागतील. त्यामुळे लॉकडाऊनचा हा पर्याय उद्योगांच्या दृष्टीने मोठे संकट ओढवणारा आहे. त्यामुळे उद्योजकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर या पर्यायांचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे.
धोका वाढतोय
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पाच दिवसांत ७६ नवे रुग्ण आढळले आहेत. गत महिन्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आली होती. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन न करणे, गर्दी करणे अशा गोष्टींमुळे संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.
कोट
पुन्हा लाॅकडाऊनची कल्पनाही करवत नाही. उद्योजकांनी अत्यंत कष्टाने त्यांचा उद्योग ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा लॉकडाऊन झाले तर कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागेल. उद्योग क्षेत्र कोलमडून पडेल.
- संजय खांबे, संचालक, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
कोट
उद्योग क्षेत्रासाठी पुन्हा लॉकडाऊन म्हणजे संकटाच्या खाईत पडण्यासारखे होईल. उत्पादित माल, शासनाचे कर, बँकांचे हप्ते, कामगारांचे पगार भागविणार कसे, असा प्रश्न आहे. याशिवाय हातून अनेक बाजारपेठाही निघून जातील.
- गणेश निकम, सचिव, सांगली, मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
कोट
सद्यस्थितीत लॉकडाऊन झाल्यास उद्योजकांचे कंबरडे मोडेल. सध्या रुळावर आलेली उद्योगक्षेत्राची गाडी पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सावरणे कठीण आहे. आता जे नुकसान होईल ते सोसण्याची ताकदही कोणाकडे राहणार नाही.
- सतीश मालू, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज