इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील कोरोनाची बाधा झालेला रुग्ण इस्लामपूर येथे तीन दिवस उपचार घेत होता. या काळात त्याचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी १५ ते १७ एप्रिल असे तीन दिवस शहरात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी सांगितले.एका बाजूला शहरातील २६ पैकी २५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असताना, पुन्हा त्याची बाधा कोणाला होऊ नये, त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, रेठरेधरण येथील एक रुग्ण इस्लामपूर शहरात तीन दिवस उपचार घेत होता.
या काळात त्याचा अनेकांशी संपर्क आला. या रुग्णाला सोडायला गेलेली रुग्णवाहिका आणि त्याचा चालक राहत असलेल्या घरकुल योजनेतील त्याचा वावर, अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामधून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या सर्व परिसराचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.