सांगली : कोरोनाबाधितांची वाढतच चाललेली संख्या लक्षात घेता उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. यासाठीच राज्य शासनाच्यावतीने १५ मेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १३ मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता त्यांच्यावरील उपचारासाठी नियाेजनास प्रशासनाने प्राधान्य द्यावे. व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात येत असून त्यांच्या तंत्रज्ञांचीही संख्या वाढविण्यात येईल. शासनस्तरावरून ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता मिरज कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३० बेडस् वाढविण्यात येत आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार सांगली शासकीय रुग्णालयाच्या आवारात ५०० बेडची सोय करण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिल्याने उपचाराची सोय होणार आहे.
जिल्ह्याला प्रतिदिन ४४ मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून हा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिविर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा व्हावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीत नोंदी करून जेवढे डोस उपलब्ध आहेत तेवढ्याच लोकांना लसीकरणासाठी बोलविल्यास केंद्रावर होणारी गर्दी टाळता येणे शक्य आहे. यासाठी प्रशासनाने नियाेजन करण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, अरुण लाड, डॉ. सुरेश खाडे, अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
चौकट
पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कमी करणे आवश्यक
पालकमंत्री म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, पॉझिटिव्हिटीचेही प्रमाण वाढत आहे. सध्या हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यासह बाधितांची संख्या वाढणार नाही यासाठी नियोजन करावे.