सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सात दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांनी वाढ करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अद्यापही जादा असल्याने आता दि. १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, पुढील निर्बंधांबाबत उद्या, सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनास्थिती व लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबाबत पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर लॉकडाऊनमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीस कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोनास्थिती अधिक गंभीर बनत चालल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी त्याची मुदत संपणार होती. बाधितांची संख्या कमी आली असली तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अद्यापही जास्त आहे. लॉकडाऊननंतरही तो कमी झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांनी लॉकडाऊन वाढवून सोमवारी याबाबत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
रुग्णांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता वाढत असून कोणताही रुग्ण व्हेंटिलेटर उपचाराविना राहणार नाही याचे नियोजन करावे. ज्या रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे व क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करून घेतले जाते, अशा रुग्णालयांचे ऑडिट करावे. जत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमाण वाढत असल्याने ते कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशीही सूचना त्यांनी दिली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, सुमन पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
चौकट
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. त्यासह शेतीतील इतर पिकांसाठीही शेती औषधांसह इतर घटक गरजेचे आहेत. त्यामुळे कृषी औषध दुकानदारांकडून ते घरपोच देता येतील का, याबाबत चर्चा करावी, अशी मागणी बैठकीत झाली. निर्बंध लागू असले तरी शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मत मांडले. यावर चर्चा करून घरपोच शेती औषधे देण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत.