सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता मिळणार आहे. रुग्णसंख्या स्थिर असल्याने व पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आता किराणा, फळे, भाजीपाला, कृषी सेवा केंद्र, बेकरी व्यवसायिकांना सकाळी सात ते अकरापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळणार असल्याचे वृत्त दिले होते. ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्यास मुदतवाढही देण्यात आली. सध्या जिल्ह्यातील बाधितांची संख्या स्थिर असली तरी अद्यापही पॉझिटिव्हीटी रेट १७.६५ वर आहे. तो कमी करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देऊन जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मार्केट कमिटी, फळ मार्केट, भाजी मंडई, हातगाडीवरील पार्सल सेवा, हॉटेलमधील पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. मालवाहतुकीस कोणतेही निर्बंध असणार नाहीत. कोणत्याही वेळी मालाची चढाई व उतरण करता येणार आहे. मार्केट यार्डातील व्यवहारास अकरापर्यंतची वेळ दिल्याने तिथे गर्दी होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यायची आहे.
राज्य शासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांची मुदत १५ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता लॉकडाऊनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आज, मंगळवारपासून शिथिल करण्यात आलेल्या नियमांनुसार निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चौकट
हे सुरू राहणार
सकाळी सात ते अकरा वेळेत किराणा, फळे, दूध, बेकरी, मिठाई, सर्वप्रकारची खाद्यदुकाने, मार्केट यार्ड, फळ मार्केट, भाजी मंडई, शीतगृहे, गोदाम सेवा, बँकिंग सेवा, कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य विक्री, रिक्षा, टॅक्सी.
चौकट
हे बंद राहणार
सलून, ब्युटीपार्लर, आठवडा बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, हातगाडीवरील खाद्यपदार्थांची विक्री बंद, मात्र पार्सल देण्यास परवानगी.