सांगली : महापालिका-नगरपालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी भाजीपाला, किराणा माल व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती.मुख्य बाजारपेठेतील दुकाने गर्दीने खचाखच भरल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. आता कधीच दुकाने उघडणार नाहीत, अशा समजुतीत नागरिक, महिला खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांनी नेमका किराणा खरेदी केला की कोरोना, असा प्रश्न पडावा, इतकी गर्दी बाजारपेठेत होती.जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात बुधवार, दि. २२ रोजी रात्रीपासून ते ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ३६४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना आणि नागरिकांतून लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली होती.
सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाला. आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होताच मंगळवारी लोकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती. गणपती पेठ, मार्केट यार्ड या परिसरातील किराणा दुकानात तुडुंब गर्दी होती. मेन रोड, मारुती रोड, हरभट रोड हे रस्तेही फुलले होते.
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला जात नव्हता. मारुती चौक, पटेल चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता, पण त्याची फिकीर लोकांना नव्हती. आता पुन्हा काहीच मिळणार नाही, अशा समजुतीत लोक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते.आठवड्यासाठी होणारे लॉकडाऊन पुढे वाढणार असल्याचीही अफवा असल्याने बाजारात गर्दी करणारे नागरिक कोरोना संसर्गाचा धोका विसरल्याचेच चित्र होेते.