सांगली : शहरासह जिल्ह्यातील शासकीय कामांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. किरकोळ व होलसेल दुकाने बंद असल्याने बांधकाम, प्लंबिंग, ड्रेनेज कामासाठी लागणारे साहित्य मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे शासनामार्फत किंवा ठेकेदार नियुक्त करुन सुरु असलेली सर्व कामे रेंगाळली आहेत.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात सध्या ड्रेनेजची कामे सुरु आहेत. ही कामे सुरु असताना खोदाई केल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्याही फुटण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्याचबरोबर जीर्ण झाल्यानेही जलवाहिन्या फुटत आहेत. या दोन्ही कामांना लॉकडाऊनमुळे साहित्य मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी ड्रेनेजचे, जलवाहिनी दुरुस्तीचे, रस्त्यांचे काम रेंगाळत आहे.
अनेक भागातील जलवाहिन्या दुरुस्त करताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अन्य ठिकाणी पडून राहिलेल्या जुन्या साहित्याचा वापर करावा लागला. अत्यंत तातडीच्या ठिकाणची कामे करण्यात आली असली तरी अद्याप बरीच कामे शिल्लक आहेत. ड्रेनेजची कामेही सध्या अंतिम टप्प्यात येऊन रेंगाळली आहेत. ठेकेदारांकडेही साहित्याची टंचाई निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या कामांसह शहरात गृहबांधणीचे प्रकल्पही सुरु आहेत. यामध्ये म्हाडाच्या तीन प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी सोडतही पार पडली आहे, मात्र त्यानंतर लॉकडाऊनमुळे कामे रेंगाळली आहेत. ठेकेदारालाही वाळू, सिमेंट, स्टिल, विटा हे साहित्य उपलब्ध होणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा लॉकडाऊन सुरु असल्याने उपलब्ध साहित्याचा वापर करुन शक्य तेवढे काम ठेकेदारांनी केले आहे, मात्र आता जवळपास हीसुद्धा कामे ठप्प झाली आहेत.
चौकट
कामगारांच्याही अडचणी
शासकीय गृहबांधणी प्रकल्प, ड्रेनेज, रस्ते कामासाठी परजिल्ह्यातील, परराज्यातील कामगार अधिक प्रमाणात आहेत. लॉकडाऊन सुरु होताच यातील अनेकजण घरी परतले आहेत. स्थानिक पातळीवर असलेल्या कामगारांनाही लॉकडाऊनमुळे बंधने आली आहेत. त्याचाही मोठा फटका या कामांना बसला आहे.
चौकट
मुभा असूनही अडचणी
बांधकाम किंवा शासकीय कामे करण्यास कोणतेही बंधन लॉकडाऊन काळात नाही. तरीही साहित्याची टंचाई व कामगारांअभावी मुभा असूनही अडचणी निर्माण झाल्या आहेत.