सांगली : राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तक पुनर्वापराचा निर्णय घेतला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत, परंतु लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्यामुळे पुस्तके परत कशी करणार, हा प्रश्न पालकांपुढे तर ती परत घ्यायची कशी, असा प्रश्न शाळांपुढे आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांकडून ३० ते ४० टक्के पुस्तके परत मिळतील, असा अंदाज शिक्षणाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
शासनाकडून सर्व शिक्षा अभियानातून शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहीत धरून यंदा सुस्थितीतील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतले जाणार आहेत.
दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. निकालही लागला नाही. परिणामी, पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन जसे पुस्तक वाटप केले, तसेच पुस्तके परतही घेण्याचे ठरविले, तरी सध्या कोरोनाकाळ असल्याने ते किती शक्य आहे, हा प्रश्न असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
पालक म्हणतात.....
शिक्षण विभागाकडून पुस्तकांची मागणी केली आहे. पुस्तके परत करायचे म्हटले, तर शाळा बंद आहेत. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये पुस्तके परत देण्यात अडचणी आहेत. जिल्हा परिषदेने पुस्तके परत करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची गरज आहे.
- विजय मोरे, पालक.
कोट
पुस्तक पुनर्वापराचा पर्याय अगदी योग्य आहे. मात्र, तो यंदाच्या लॉकडाऊनमध्ये कितपत शक्य आहे, अशी शंका आहे. शाळाही बंद असल्यामुळे ती द्यायची तर कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने पुस्तके परत करण्यासाठी मुदत वाढवून दिल्यास आम्ही देण्यास तयार आहे. पुस्तके पुनर्वापराचा निर्णय चांगला आहे.
- विष्णू पाटील, पालक.
कोट
जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पुस्तके पुनर्वापरासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार, त्यांचा शिक्षक आणि पालकांशी संपर्क सुुरू आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकडून फारसी पुस्तके मिळणार नाहीत, पण पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा पुस्तकाचा वापर चांगला असतो. यामुळे ३० ते ४० टक्केपर्यंत पुस्तके परत मिळतील, अशी अपेक्षा आहे.
-विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
चौकट
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
तालुका विद्यार्थी संख्या
पहिली ३९,५२६
दुसरी ४२,६२७
तिसरी ४३,६५८
चौथी ४३,६१५
पाचवी ४४,४८३
सहावी ४३,५३६
सातवी ४३,६०२
आठवी ४४,०९५
चौकट
अशी आहे आकडेवारी
- मागील वर्षी संच वाटप : २,३५,७७२
- या वर्षी मागणी : २,२७,५२६