सांगली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला यंदाही लॉकडाऊनचे ग्रहण लागले. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक्स व वाहन बाजारात या मुहूर्तावर होणारी सुमारे ७६ कोटी रुपयांची उलाढाल थांबली. दोन वर्षांत अनेक मुहूर्त चुकल्याने व्यापारी, व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ, घरबांधणी व्यवसायांत कोट्यवधींची उलाढाल होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून यादिवशी नव्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला कोरोनाने धक्का दिला आहे. वाहन क्षेत्र, सराफ व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यंदा ठप्प झाला आहे. कडक लॉकडाऊनमुळे या विविध क्षेत्रातील सुमारे ९५ कोटी रुपयांची उलाढाल थांबली आहे.
शासनाच्या महसुलाच्या आकडेवारीवरूनही व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या वर्षभरात जीएसटीचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल व्यापार, व्यावसाय ठप्प असल्यामुळे बुडाला होता. यंदाही तशीच स्थिती दिसत आहे.
चौकट
अशी थांबली उलाढाल
सराफ बाजार ९ कोटी
इलेक्ट्रॉनिक्स २० कोटी
दुचाकी १३ कोटी
चारचाकी ३२.५० कोटी
बांधकाम २०.५ कोटी
चौकट
कर्जात बुडाले व्यापारी
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत विविध क्षेत्रातील व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. सलग तीन वर्षांपासून सांगली जिल्ह्यात हे व्यापारी संकटांना तोंड देत आहेत. व्यापार बंद असताना, शासनाचे कर, पाणी, विद्युत बिले, घरपट्टी आदी कर भरावे लागले. बँकांचे हप्ते भरले न गेल्याने अनेकांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. ज्यांनी माल भरून ठेवला अशा लोकांचा माल गेल्या दोन वर्षांपासून तसाच आहे.
कोट
सराफ बाजाराला गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा आणि त्यापूर्वी महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक सराफ व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. नव्याने आलेले व्यावसायिकही हादरले आहेत.
- पंढरीनाथ माने, सचिव, सांगली सराफ समिती
कोट
बांधकाम व्यवसायात मुहूर्तावर होणारी उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. साहित्य मिळत नसल्याने अनेकठिकाणी बांधकामांना अडचणी येत आहेत. कडक लॉकडाऊनचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे.
- दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई