सांगली : जिल्ह्यातील लॉकडाऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार आणखी कडक होण्याची शक्यता आहे. सध्या सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुली राहणारी किराणा मालाची दुकाने आता सकाळी ११ पर्यंतच चालू राहण्याची चिन्हे आहेत. बेकऱ्या, मंडई यांच्यासाठीही हाच नियम लावला जाण्याची शक्यता आहे. अद्याप जिल्हा स्तरावर याबाबतचे आदेश प्राप्त झालेले नाहीत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शासनाचे स्पष्ट आदेश दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊन काळात बेकऱ्या, किराणा दुकाने, किराणा माल विक्रीचे बझार, दूध डेअऱ्या, दूध वितरण, मटण दुकाने, फळविक्री, भाजी मंडई, हॉटेल्समधील पार्सल सोय यांना मुभा देण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ८ या काळात ही दुकाने सुरू असतात. तरीही याठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सकाळी ९ ते ११ या काळातच या दुकानांना परवानगी देण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
सांगली जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर ही दुकाने सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला खरेदीसाठी मंडई व होलसेल बाजारात गर्दी होत आहे. फळमार्केटमध्येही नियम माेडले जात आहेत. काही बझारमध्येही किराणा माल खरेदीसाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे या सर्वाांवर निर्बंध येण्याची चिन्हे आहेत. सकाळी ९ ते ११ या वेळेतच नागरिकांना संबंधित माल खरेदी करता येणार आहे. बेकऱ्या, मटण दुकाने, फळविक्री व भाजीपाला विक्रीलाही हे नियम लागू शकतात. याबाबतचे स्पष्ट आदेश दोन दिवसांत मिळण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या लॉकडाऊनला केवळ १० दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित दिवसांसाठी हा नियम लावून लॉकडाऊन कायम ठेवल्यास त्यात हा नियम राहण्याची शक्यता आहे.
चौकट
यांना लागणार नाहीत नियम
मेडिकल व वैद्यकीय सेवा, सुविधांवर वेळेचे बंधन नाही. नव्या नियमातही त्याचा समावेश नाही, मात्र पेट्राेलपंप ही अत्यावश्यक सेवा असूनही त्यांना पेट्रोल कोणाला द्यायचे, यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.