सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हया'तील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबरोबरच जिल्हयातर्गत विधानसभेच्या जागांची अदलाबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवेळी सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या लोकसभेच्या जागेची मागणी व्यक्त केली होती. दुसरीकडे जत विधानसभा मतदारसंघाची जागाही काँग्रेस नेत्यांनी आपल्याकडे राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे, दोन्ही निवडणुकांसाठी जागांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सतेज पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राष्टÑवादीकडील कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली, तर काँग्रेसकडील सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा राष्टÑवादी मागू शकते. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अशा प्रकारच्या मागणीला तीव्र विरोध होऊ शकतो. त्याचप्रकारच्या विरोधाचा सामना कोल्हापुरातही करावा लागणार आहे. त्यामुळे मागण्या व चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवार व पक्षाचे प्रमुख नेते सावध झाले आहेत.
जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे या जागेवरील काँग्रेसची दावेदारी आक्रमकपणे होताना दिसत आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी जतच्या जागेच्या बदल्यात मिरज विधानसभेची जागा राष्टवादीला देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील काँगे्रस व राष्टवादीचे इच्छुक, पदाधिकारी व कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. पक्षीय नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असला तरी, विरोध व संघर्षाची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत. जागांची अदलाबदल केवळ या चार मतदारसंघांपुरतीच राहणार नसून, अन्य मतदारसंघातही अशाचप्रकारच्या चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत. निवडणुका लांब असल्या तरी, आतापासूनच आघाडीतील नेत्यांनी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आघाडी गृहीत धरून सूचना!काँग्रेस व राष्टवादी या दोन्ही प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी लोकसभा, विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, त्यांनी आघाडी होणार असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीबाबत आग्रही असलेल्या या दोन्ही नेत्यांकडून ऐनवेळी जागांची अदलाबदल करून आघाडीच्या चर्चा यशस्वी केल्या जाऊ शकतात.जयंत पाटील यांचेही संकेत!सोमवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल, त्याठिकाणची जागा मित्रपक्षाला सोडण्याबाबत विचार होईल. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. तरीही भविष्यात याबाबत सामंजस्याने, निवडून येण्याची क्षमता व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जातील.