- श्रीनिवास नागे
माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी काँग्रेस पक्षाला जाहीर सोडचिठ्ठी दिली. त्यावर साधकबाधक प्रतिक्रिया उमटल्या. ‘सांगलीच्या काँग्रेसची अखेर सुटका झाली!’ असा सूर काहींचा होता, तर काहींनी ‘हे दादा घराण्याचे खच्चीकरण’ असा राग आळवला. सच्च्या काँग्रेसप्रेमी-दादाप्रेमींना वेदना देणाऱ्या या घटनेतून एक दिलासाही मिळाला बरं!‘पहले आप-पहले आप’ किंवा ‘तू-तू, मैं मैं’ करण्याच्या नादात लोकसभेची सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जात असताना, ऐनवेळी मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांनी दादाप्रेमींना नव्यानं हाक दिलीय. शड्डू ठोकलाय... सैन्याला हेच हवं असतं.राजकारणात पूर्वसूरींच्या पुण्याईवर फार काळ तग धरता येत नाही. सामान्य लोकांना गृहित धरून राजकारण करता येत नाही. कार्यकर्त्यांची अपेक्षा न ओळखू शकणाऱ्या नेत्याचा टिकाव लागत नाही आणि जगरहाटी बदलत असताना जनसंपर्क न ठेवता स्वत:च्याच विश्वात रमणाºया नेत्याला इथली यंत्रणाच बाजूला सारते... रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाºया प्रतीक पाटलांच्या वाटचालीकडं बघताना या साºयाचा प्रत्यय येतोच ना?‘बरे झाले तुम्ही काँग्रेस सोडली. खरं तर सांगलीच्या काँग्रेसचीच सुटका झाली!’ इथंपासून ‘पक्ष सोडण्याच्या हंगामातली काँग्रेससाठीची चांगली घटना!’, ‘काय हा कृतघ्नपणा!’ इथंपर्यंतच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडला.
प्रतीक पाटील म्हणतात त्यानुसार खरंच काँग्रेसला त्यांची गरज उरलेली नाही! कारण अडचणीतून चाललेल्या पक्षाला उभारी देण्याऐवजी निष्क्रियतेची परिसीमा गाठणाºया पाटील यांनी पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही स्वत:ला दूर ठेवलं होतं. आंदोलनं, मोर्चे वगैरे सोडाच, पण खुद्द प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षमेळाव्याकडंही पाठ फिरवली होती. मागच्या निवडणुकीत सपाटून मार खाण्यामागं जशी मोदी लाट होती, तशी पाटील यांची निष्क्रियताही कारणीभूत होती! पक्षानं दोनदा खासदारकी दिली. वसंतदादांचे नातू, संयमी आणि शांत स्वभाव (खरं तर आक्रमकपणाचा अभाव), उपद्रवमूल्य नसणं, स्वच्छ चारित्र्य, पक्षाशी एकनिष्ठता हे त्यांचे ‘प्लस पॉइंट’. यामुळंच केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पण त्याचा फायदा ना पक्षाला झाला, ना वसंतदादा गटाला! दादांसारखं संघटन, जनसामान्यांचं मन आणि कार्यकर्त्यांची नस ओळखणं यांना कधी जमलंच नाही.
प्रतीक पाटील खासदार-मंत्री असताना जिल्ह्यात काँग्रेसकडं असलेल्या एकेक संस्था विरोधकांकडं जात होत्या. तेव्हाही ते थंड होते. ‘मी स्थानिक राजकारणात लक्ष घालत नाही’, ही त्यांची तेव्हाची मखलाशी! गेली पाच वर्षं तर ते दिसतच नव्हते. भाजपनं जेव्हा काँग्रेसच्या ताब्यातील आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका-महापालिका, ग्रामपंचायतीवर कब्जा करण्याचा सपाटा लावला होता, तेव्हा प्रतीक पाटील कुठं होते, हे तेच जाणोत! ही हाराकिरी होती.
जिल्ह्यात त्यांना स्वत:चा गट, वकूब निर्माणच करता आला नाही, हे त्या हाराकिरीमागचं कारण. त्याही उपर खुद्द वसंतदादांनी स्थापन केलेल्या, त्यांच्याच नावाच्या संस्था लयाला जात असतानाही ते तसेच थंड होते! त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात आशिया खंडातला दुसºया क्रमांकाचा वसंतदादा सहकारी साखर कारखाना चक्क वर्षभर बंद होता!! पक्षाला रामराम करत पाटील यांनी आता राजसंन्यासच जाहीर केलाय. यापुढं समाजकार्य करत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. (म्हणजे नेमकं काय करणार हो, असं काही नतद्रष्ट विचारतात! असो.) याच समाजकार्यासाठी त्यांनी काही वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या वसंत-प्रकाश प्रतिष्ठानचं तर आता नावही ऐकू येत नाही.
वसंतदादांनी राज्यात ‘दादा लॉबी’ पॉवरफुल करत दिल्लीवरही वचक ठेवला होता. मृदू स्वभावाच्या त्यांच्या चिरंजीवांचा-प्रकाशबापूंचा मात्र तो पिंड नव्हता. दादांचे पुतणे विष्णुअण्णांचे चिरंजीव मदन पाटील यांनीही जिल्हाभरात वचक निर्माण केला होता. खुद्द दादांच्या हयातीतच राज्यात, जिल्ह्यात तोंड वर काढलेल्या विरोधकांनी दादा घराण्याचं पानीपत करण्याची एकही संधी सोडली नाही. आता प्रतीक पाटलांनी काढता पाय घेतलाय, पण त्यांचे लहान बंधू विशाल यांनी मात्र विरोधकांशी चार हात करण्यासाठी कंबर कसलीय. विशाल आणि प्रतीक यांची स्वभाववैशिष्ट्यं अगदी भिन्न. विशाल चाणाक्ष, आक्रमक. जिल्हाभरातल्या विरोधकांना (मदन पाटील गटालाही) अंगावर घेणारे. थंड डोक्यानं डावपेच आखणारे. जिल्हा बँकेच्या एका निवडणुकीत मदन पाटील यांच्या शिलेदाराकडून अवघ्या चार मतांनी पडले, पण पुढच्याच निवडणुकीत खुद्द मदन पाटील यांनाच त्यांनी धूळ चारून जिल्हा बँकेत प्रवेश केला. (आठवतंय ना?) भल्याभल्यांचे अंदाज खोटे ठरवत कुणाशीही कशीही हातमिळवणी करण्यात माहीर. साखर कारखाना खासगी संस्थेस चालवण्यास देण्याची नामुष्की आली खरी. पण त्यातूनही ते बिनाबोभाट बाहेर पडलेले. आता त्यांनी पुन्हा फौजेची जमवाजमव केलीय.
ताजा कलम :लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या घोळनाट्याच्या पहिल्या अंकात विशाल पाटील उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते. (ते तसं दाखवत तरी होते.) त्यावेळी स्वत:चं लक्ष्य विधानसभा असल्यानं त्यांनी चतुराईनं विश्वजित कदम यांचं नाव पुढं केलं. कदम यांनीही उमेदवारी नाकारली. पण ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जात असल्याचं दिसताच काँग्रेसप्रेमी एक झाले. काँग्रेस कमिटीला टाळं ठोकलं गेलं. दादा घराणं मैदानातून पळ काढत असल्याचं विश्वजित यांनी सांगताच विशाल यांनी शड्डू ठोकून मैदानात उतरण्याची तयारी दाखवली. तिथंच त्यांनी हलवून खुंटा बळकट केला! रविवारी दादाप्रेमींचा मेळावा घेऊन भाजपकडं पळणारं सैन्य थांबवण्याचा ‘गेम प्लॅन’ त्यांचाच.त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांच्या पोटात ढवळायला लागलंय, ते त्यामुळंच...(इस्लामपूर आणि सोनहिºयाकडं आम्ही बोट करत नाही हं!)प्रसंग... तो आणि हा!प्रतीक पाटलांनी राजसंन्यास घेतल्याचं ऐकून आपसूक वसंतदादांच्या राजकीय संन्यासाची आठवण होतेच. पण तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये, संदर्भांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर. राजकीय ताकद असतानाही हायकमांडनं डावलल्यानं चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दादांनी राजसंन्यास जाहीर केला होता. ती त्यांची रणनीती होती. ‘मास लीडर’चे अफलातून डावपेच होते. दादांनी राजसंन्यास जाहीर करून जनमताचा कौल घेतला, तर लोकांनी त्यांना राजसंन्यास मागे घेण्यास लावून पुन्हा सक्रिय राजकारणात येण्यास भाग पाडलं. दादा पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.
पण यांचं काय..? ना कुठली रणनीती, ना डावपेच. वसंतदादा घराणं राजकारणातून संपवण्याचा चंग बांधलेल्यांशी दोन हात करण्याऐवजी राजकीयदृष्ट्या गलितगात्र होऊन पडणं, एवढंच यांच्या हाती राहिलंय.जिल्ह्यात उद्ध्वस्त धर्मशाळेकडं वाटचाल करणाºया पक्षाला आणि तमाम दादाप्रेमींना बळकटी देणं जमणार नसल्यानं प्रतीक पाटील स्वत:हूनच पक्षातून बाजूला झाले, हेच बरं झालं..!