सांगली : निवडणूक कालावधित अभिरूप निरीक्षण नोंदवहीपेक्षा कमी खर्चाचा तपशील दिल्याबद्दल भाजपचे उमेदवार संजय पाटील व आघाडीचे उमेदवार विशाल पाटील या दोघांना खर्चातील तफावतीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. दोघांनाही येत्या ४८ तासात यावर म्हणणे सादर करावयाचे आहे.
निवडणूक कालावधित १२ एप्रिलपर्यंतचा खर्च सादर करण्याचे निर्देश उमेदवारांना देण्यात आले होते. २८ मार्च ते १२ एप्रिलपर्यंतच्या अभिरूप निरीक्षण नोंदवहीतील खर्च व उमेदवारांनी सादर केलेला खर्च यात तफावत आढळली आहे. भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी नोंदवहीप्रमाणे ५९ लाख ५८ हजार ७६३ रुपये खर्च केला आहे, तर त्यांनी सादर केलेला खर्च हा ४२ लाख २४ हजार ७९७ रुपये आहे. यात नोंदवहीतील खर्च व उमेदवाराच्या खर्चात १७ लाख ३३ हजार ९६६ रुपयांची तफावत आहे. तसेच नोंदवहीतील विविध बाबींवरील २६ लाख ३९ हजार ७३५ रुपयांचा खर्च दैनंदिन लेख्यांमध्ये नोंद नाही.
आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचाही खर्च अधिक असून अभिरूप निरीक्षण नोंदवहीप्रमाणे खर्च ३५ लाख ७० हजार ४११ रुपये आहे, तर पाटील यांनी सादर केलेला खर्च २६ लाख १८ हजार ४३६ रुपये आहे. यातील तफावत ९ लाख ५१ हजार ९७५ रुपयांची आहे. नोंदवहीमधील विविध बाबींवरील १५ लाख ४३ हजार ६४४ रूपये खर्च दैनंदिन लेख्यांमध्ये नोंद नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या खर्चाबाबतही तफावत असली तरी, त्यांच्या प्रतिनिधीने ती मान्य केल्याने, त्यांना नोटीस दिलेली नाही.