सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना, सांगलीतील माजी आमदार संभाजी पवार यांचा गट मात्र संभ्रमावस्थेत सापडला आहे. युतीचा धर्म पाळताना भाजपचा उमेदवार हा या गटाचा विरोधक आहे, तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला साथ द्यायची म्हटले, तर जयंत पाटील यांच्यारूपाने त्या बाजूलाही राजकीय शत्रूच उभा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकी भूमिका काय घ्यायची, अशी या गटाची कोंडी झाली आहे.सांगली विधानसभा मतदारसंघात संभाजी पवार यांचा मोठा गट आहे. संभाजी पवारांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम शिवसेनेत आहेत. संभाजी पवारांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला नसला तरी, ते नेहमी मुलांसोबत असतात. त्यामुळे पवार गट हा सद्य:स्थितीत शिवसेनेत आहे. तरीही राजकीयदृष्ट्या सध्या हा गट गोंधळात सापडला आहे.हातकणंगले मतदारसंघात या गटाने नेहमीच खासदार राजू शेट्टी यांची साथ दिली. यंदाही ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्यासोबत राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील फिरत आहेत. जयंत पाटील हे पवार गटाचे क्रमांक एकचे राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे शेट्टी यांच्यासोबत जाणे म्हणजे जयंत पाटील यांच्याबरोबर जाण्यासारखेच आहे. त्यामुळे यंदा हातकणंगले मतदारसंघाबाबत या गटाने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर याठिकाणी युतीचा धर्म म्हणून भाजपची साथ द्यायचा निर्णय घेतला, तर भाजपचे उमेदवार म्हणून खासदार संजयकाका पाटील मैदानात आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊ नये म्हणूनच पवार गटाने भाजपशी पंगा घेतला होता. शेवटी नाईलाजास्तव याच कारणावरून पवार गट भाजपमधून बाहेर पडला होता. त्यामुळे आता संजयकाका पाटील यांना मदत केली, तर आपल्याच तत्त्वांशी ती प्रतारणा होणार आहे. संजयकाका पाटील यांनासुद्धा पवार गट आपला शत्रू मानतो. त्यामुळे ते शिवसेनेत असूनही सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपला साथ देऊ शकत नाहीत.संजयकाका पाटील यांचे विरोधक म्हणून विशाल पाटील यांना साथ देण्याचा विचार केला तरीही, त्याही बाजूला पुन्हा जयंत पाटील समोर आहेत. वसंतदादा गट आणि राजारामबापू गट यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला असला तरी, विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे पवार गट सध्या तटस्थ आहे. त्यांची भूमिका लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.कार्यकर्ते शांत : नेत्यांच्या भूमिकेकडे लक्षदोन्हीही बाजूला शत्रूंचेच चेहरे असल्याने, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचीच भूमिका पवार गटाने स्वीकारल्याचे चित्र आहे. पवार गटातील कार्यकर्त्यांना संभाजी पवार किंवा त्यांच्या दोन्ही मुलांनी कोणतीही सूचना दिलेली नाही. शिवसेनेतील संजयकाका पाटील यांच्याविरोधातील एक गटही आता युतीधर्म पाळताना दिसत आहे, मात्र पवार गटाला युतीधर्म पाळणे हे धर्मसंकट बनले आहे.
Lok Sabha Election 2019 संभाजी पवार गट राजकीय पेचात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:04 PM