जत : ज्यांना स्वाभिमानच नाही, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगलीच्या लोकसभा निवडणुकीत उतरली आहे. ऊस बिल आंदोलनात ज्यांना शिव्यांची लाखोली वाहिली, त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानीचे नेते बसले आहेत. एकूणच कारभार पाहता येथे महाआघाडीची महाखिचडी झाल्याचे चित्र आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
संख (ता. जत) येथे खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राज्य शासन पक्षपाती भूमिका घेवून सिंचन योजनांमध्ये दुजाभाव करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जात आहे. परंतू विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजनांना मोठा निधी देऊन त्या योजना पूर्णत्वास आणल्या आहेत. याशिवाय बंद पडलेल्या योजनाही सुरू केल्या आहेत. बळीराजा सिंचन योजना व पंतप्रधान सिंचन योजना सुरू करून राज्य शासनाने बंद जलवाहिन्यांमधून शेतकºयांना पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. बंद जलवाहिन्यांमुळे पाण्याचे नुकसान कमी होऊन पाणी लवकर मिळणार आहे. सिंचन योजनेच्या वीज बिलाचा आर्थिक भार शेतकºयांना सहन होत नाही, यामुळे राज्य शासनाने या योजना सौर ऊर्जेवर चालविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे शेतकºयांना कमी पैशात पाणी मिळणार आहे. वीज बिलाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी १९ टक्के शेतकरी व ८१ टक्के शासन, असे विभाजन करून वीज बिल भरुन घेतले जात आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील विस्तारित पाणी योजनेला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. परंतु माझ्या तोंडातून जाहीर सभेत हे वदवून घेण्यासाठी खासदार संजय पाटील व आमदार विलासराव जगताप यांनी संख येथे माझी जाहीर सभा आयोजित केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पाणी आले आहे. आता पूर्व भागातही पाणी आल्यामुळे तेथेही परिवर्तन होईल.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीने आपल्या कार्यालयाला कुलूप लावून ‘आमची शाखा कुठेही नाही’ हे लोकसभा निवडणुकीतून दाखवून दिले आहे. ही एक शोंकातीका आहे. त्यामुळे ते खरे स्वाभिमानी नाहीत, तर आम्हीच खरे स्वाभिमानी आहोत. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात जिल्हा कॉंग्रेस कमिटीने एकही कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे दादांची काँग्रेस आता राहिलेली नाही, हेच यावरून स्पष्ट होते. वसंतदादांनी सांगली जिल्'ासाठी जे काम केले, ते आजपर्यंत कोणीही केले नाही. याची जाणिव ठेवून राज्य शासनाने वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात कार्यक्रम घेऊन त्यांच्याबद्दल असलेला आदर व्यक्त केला.
आदिवासी समाजासाठी अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला लागू असेल, याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जातीपातीचे राजकारण करून समाजात विष कालविण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, परंतु त्याकडे लक्ष न देता मतदारांनी राज्य शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार संजय पाटील यांना मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.
खासदार संजय पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून दर्जाहीन टीका-टिप्पणी केली जात आहे. विरोधी उमेदवारांची ही अखेरची व शेवटची धडपड सुरू आहे. समाजाचे नाव घेऊन भावनिक आवाहन केले जात आहे. तरुणांना आमिष दाखवून भडकविण्याचे काम केले जात आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही यासंदर्भात बोलणार आहोत. माझ्यावर पाठीमागून वार केले जात आहेत. म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेली जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४७ गावे व कमी दाबाने पाणी मिळत असलेली सतरा गावे, अशा एकूण ६५ गावांना नवीन प्रस्तावित योजनेतून पाणी देण्याचा प्रयत्न आहे.
आमदार विलासराव जगताप म्हणाले, म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेत सुरुवातीला जत तालुक्याचा समावेश नव्हता. राज्यात आघाडीचे सरकार असताना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेत जत तालुक्याचा समावेश करून कंठी (ता. जत) येथे कामास प्रारंभ करण्यात आला. आघाडी सरकारच्या काळात जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आले नाही, परंतु युती शासनाच्या कालावधीत म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या नवीन प्रस्तावित योजनेचा आराखडा तयार असून त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारांचा कौल निश्चित स्वरूपात आम्हाला मिळेल.
यावेळी आमदार सुरेश खाडे, दिनकर पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, बालगाव मठाचे प्रमुख अमृतानंद स्वामीजी, बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. रवींद्र आरळी, पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, शिवाजीराव ताड, राजेंद्र कन्नुरे, विवेक कांबळे, उमेश सावंत, प्रभाकर जाधव, मंगल पाटील, आर. के. पाटील, संजय कांबळे, कविता खोत, संजय तेली, आर. बी. पाटील उपस्थित होते.