सांगली - वसंतदादा पाटील यांच्या नावाने मते मागणाऱ्या त्यांच्या वारसदारांनी त्यांच्या नावाच्या संस्थाच बुडविल्या. त्यामुळे ते कोणत्या अधिकाराने मते मागत आहेत, असा सवाल खासदार संजयकाका पाटील यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील मारुती चौकात सभा पार पडली. यावेळी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वसंतदादा कारखाना चालवायला देऊन अभिमान बाळगणाऱ्या विशाल पाटील यांच्या घरात ११ वेळा खासदारकी मिळाली. पण त्यांनी सांगलीसह जिल्ह्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काय केले? कोणते प्रश्न मार्गी लावले?
विशाल पाटील हे दादांचा नातू म्हणून मते मागत आहेत. त्यांनी कारखाना चालवायला दिला, पण कामगारांना देशोधडीला लावले. कामगारांचे भविष्य निर्वाह निधीसह अनेक देणी दिलेली नाहीत. कामगारांना टाचा घासून मरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडील उमेदवार हे जातीच्या आधारावर निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा पूर्वइतिहास वेगळा होता, आता ते एमआयएमचे ओवेसी यांच्या नावे लढत आहेत. ओवेसींचा जातीधर्माचा विखारी चेहरा संसदेत अनुभवला आहे. या लोकांची महत्त्वाकांक्षा ही राक्षसी स्वरुपाची आहे.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजपाने जिल्ह्यात सर्वत्र यश मिळविले. अनेक संस्था काबीज केल्या. तरी पक्षाचे वृक्ष लावणारे संभाजी पवार यांची उणीव होती. त्यांच्या पाठबळामुळे आता संजय पाटील यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळेल. गौतम पवार म्हणाले, काँग्रेसविरोधात पूर्वीपासून संभाजी पवार यांनी आवाज उठविला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सभा याच मारुती चौकात झाल्या आणि यशही आले आहे. आजही या सभेचा संकेत तोच आहे. सभेस माजी आमदार नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, रमेश भाकरे, सुरेश आवटी उपस्थित होते.
काँग्रेसनेच सांगली काँग्रेसमुक्त केली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आम्ही नेहमी काँग्रेसी विचारांपासून मुक्त भारताचा निर्धार करीत होतो; मात्र सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या प्रयत्नात पक्षाची जिरवून हा जिल्हा काँग्रेसमुक्त केला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली आहे. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ येथील स्टेशन चौकात रविवारी सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार संभाजी पवार, नितीन शिंदे, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पृथ्वीराज देशमुख, शिवसेनेचे नेते गौतम पवार आदी उपस्थित होते.