सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार आता सांगली लोकसभा मतदार संघात १८ लाख ३ हजार मतदार, तर हातकणंगले मतदारसंघाचा भाग असलेल्या इस्लामपूर व शिराळा मतदार संघात ५ लाख ५० हजार मतदारांची नोंद झाली आहे. प्रशासनाच्या सुधारित आकडेवारीनुसार आता जिल्ह्यात २३ लाख ६३ हजार १२८ मतदारांची नोंद झाली आहे.
प्रशासनाकडून यापूर्वी ३१ जानेवारीअखेरची मतदार यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम सुरू ठेवण्यात आली होती. या मोहिमेनंतर जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ झाली आहे. या मतदारांना लोकसभेसाठी मतदान करता येणार आहे. नवीन आकडेवारीनुसार सांगली लोकसभा मतदारसंघासाठी १८ लाख ३ हजार मतदार असणार आहेत. त्यात पुरूष मतदार ९ लाख २९ हजार २३२ आणि स्त्री मतदार ८ लाख ७३ हजार ७४९ आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदार संघात असलेल्या शिराळा मतदार संघात २ लाख ९० हजार आणि इस्लामपूर विधानसभा मतदार संघात २ लाख ६९ हजार मतदार आहेत.मतदार नोंदणी मोहिमेतील पहिल्या पुरवणी यादीत जिल्ह्यात १ लाख २८ हजार ८७० मतदारांची नोंद झाली असून, १२ हजार ३५७ मतदारांना वगळण्यात आले. दुसºया पुरवणी यादीत १७ हजार ६७० मतदारांची नोंद झाली, तर चार हजार ८४७ मतदारांना वगळण्यात आले आहे.