सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आॅफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहेत. आरक्षण प्रश्नावरील काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो. गेल्या सत्तर वर्षांत कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. भाजपने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. असे असतानाही ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगावे.
भाजपच्या नेत्यांनी खूप प्रयत्न करुनही ते निवडणूक लढवीत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनी आजूनही योग्य तो निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.भाजपला मते देण्यास सांगत नाही!
भाजपला धनगर समाजाने मते द्यावीत, म्हणून मेळावा बोलावलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तरीही मेळाव्यातील भाजप पदाधिकाºयांनी, पडळकरांसोबत नव्हे, तर भाजपसोबत राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले.
राणेंना फूटपाथवरून मुख्यमंत्री पदापर्यंत नेले!भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.