हणमंत पाटील
सांगली- महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले. अखेर 'मविआ 'मध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी एकास एक लढत होण्याऐवजी तिरंगी झाली. खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभेसाठी उद्धवसेनेने अचानक प्रवेश घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसचे विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी संघर्ष केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारीसाठी काँग्रेसचा 'एबी फार्म' न मिळाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसच्या अस्तित्वाची व अस्मितेची लढाई असल्याचे सांगत सहानभूतीचे भांडवल करीत ते मैदानात उतरले आहेत.
विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक
सांगलीच्या जागेच्या संघर्षामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व डॉ. पतंगराव कदम या दोन्ही घराण्यांतील वाद मिटला. जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली; पण ही जागा उद्धवसेनेला गेली. त्यामुळे विश्वजित कदम हे आघाडीधर्म पाळणार की बंडखोरीला साथ देणार, त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
निवडणुकीत कळीचे मुद्दे
सांगलीच्या दुष्काळी तालुक्यातील टेंभू योजनेचा नवीन २३ गावांत विस्तार,
विमानतळ, लॉजिस्टिक पार्क, २ ड्रायपोर्टचे केवळ कागदावर असलेले प्रकल्प.
सांगली शहरातील कृष्णा • नदीचे प्रदूषण, नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा.
एकूण मतदार
९,५२,००५ पुरुष१८,६५,९६०९,१३,८४३ महिला
'मविआ'त बिघाडी
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला. उद्धवसेनेला ही जागा गेल्याने काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय होणार की नाहीत, याविषयी संभ्रम आहे.
भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर
खासदार संजय पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत जतमधील भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बंडखोराला साथ देण्याचा निर्णय घेतला.
• माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी वेळोवेळी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतही जाहीर नाराजी व्यक्त केली.
मिरजेतील काही भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, ती थोपविण्याचे आव्हान भाजपमधील नेत्यांपुढे आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
संजय पाटील भाजप (विजयी) ५,०८,९९५
विशाल पाटील स्वाभिमानी पक्ष ३,४४,६४३गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडी ३,००,२३४नोटा ५,६८५