सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटील चीतपट; ठाकरेंच्या पैलवानाची भाजपाच्या मल्लाशी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:19 AM2024-03-27T11:19:03+5:302024-03-27T11:27:10+5:30
Chandrahar Patil : सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती, तर ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती.
Chandrahar Patil Sanjaykaka Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा सुरू होता. आज ठाकरे गटाने लोकसभेसाठी पहिल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे आता भाजपाच्या संजयकाका पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात लढत होणार आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दावा सांगण्यात आला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती, तर ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी जाहीर केली होती.
संजयकाका पाटलांनी चंद्रहार पाटलांना दिलं आव्हान
"भाजपच्या पहिल्या यादीत माझं नाव आलं, जिल्ह्यात १० वर्ष काम करत असताना अनेक मोठी काम करता आली. येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ, विरोधकांच्या उमेदवारांच्यात अजूनही तु 'तु मै मै' सुरू आहे. माझी भूमिका अशी की, दोघांनी एकमेकांना आजमावं आणि या निवडणुकीत यावं, लोक निश्चितपणाने 'दूध का दूध, पाणी का पाणी' करतील, असं आव्हान संजयकाका पाटील यांनी चंद्रहार पाटील यांना दिलं आहे.
सांगली लोकसभा मतदार संघ २०१४ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २०१४ च्या मोदी लाटेत या मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्याविरोधात विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली, तर वंचित बहुजन आघाडीतून गोपीचंद पडळकर होते या निवडणुकीतही संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला.