वसंतदादा घराणं काँग्रेस सोडणार नाही - प्रतिक पाटील यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 03:07 PM2019-03-21T15:07:34+5:302019-03-21T15:09:06+5:30
भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे
सांगली - विखे-पाटील आणि मोहिते पाटील घराण्यासोबत राज्यातलं आणखी एक महत्त्वाचं घराणं वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबाच्या भाजपा संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे.
वसंतदादा पाटील घराण्यातील प्रतिक पाटील काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र चर्चेला पूर्णविराम देत प्रतिक पाटील यांनी आम्ही काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी बोलताना प्रतिक पाटील म्हणाले की, भाजपात जाण्याचं कोणतीही हालचाल नाही, आमचे संबंध सगळ्या पक्षातील नेत्यांची चांगले आहेत. वसंतदादांचा वारसा असल्याने काँग्रेस सोडण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितले.
दरम्यान सांगलीची जागा काँग्रेस खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनही केलं होतं.याच पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रतिष्ठीत घराणे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांची भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्याचं समोर येतंय.
मात्र सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी आहे पण काँग्रेसच्या वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मान्य करणार. राजू शेट्टी हे देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही नाहीत. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक अथवा दोन जागा सोडाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांची आहे. त्यामुळे पक्षातील नेते सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील. मात्र असं असलं तरी वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही. पक्षासाठी आम्ही सगळे वाद बाजूला ठेऊन एकत्र येतो त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा आहे असं प्रतिक पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगली लोकसभा मतदार संघावर गेल्या ६० वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. यात ३५ वर्षं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व राहिलं आहे लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला होता. आणि भाजपनं संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून हा गड काबिज केला.