सांगली : वसंतदादा कारखाना परिसरापासून दक्षिणेकडे चिंतामणीनगर आणि उत्तरेकडे माधवनगरपर्यंत प्रतीक पाटील यांचा घरचा परिसर मानला जातो. याचठिकाणी त्यांचे निवासस्थान, वसंतदादा साखर कारखाना व अन्य संस्था उभ्या आहेत. तरीही येथील लोकांनी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा भाजपचे संजय पाटील यांच्याच पारड्यात दुपटीहून अधिक मते टाकली आहेत. मोदींचे वादळ असले तरी, लोकांच्या नाराजीचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता काँग्रेस नेत्यांवर आली आहे. वसंतदादा कारखाना परिसर, आरटीओ कार्यालय, लक्ष्मीनगर, शिवोदयनगर, चिंतामणीनगर, पंचशीलनगर, कलानगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, नानीबाई मळा, सरगर मळा हा परिसर प्रतीक पाटील व वसंतदादा पाटील घराण्याच्या हक्काचा मानला जातो. या परिसरात यापूर्वी कधीही प्रतीक पाटील यांना असा फटका बसला नव्हता. या ठिकाणच्या एकूण १३ मतदान केंद्रांवर संजय पाटील यांना ५ हजार २४६, तर प्रतीक पाटील यांना २ हजार ७९१ मते मिळाली. संजय पाटील यांचा पूर्वी या परिसराशी संपर्क होता. गेल्या काही वर्षात त्यांचा संपर्क तुटला होता. तरीही लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी प्रतीक पाटील यांच्याऐवजी संजय पाटील यांना अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे आ. संभाजी पवारांनी संजय पाटील यांना उघडपणे विरोध केला. गावभागातील एका सभेत संजय पाटील यांनी संभाजी पवारांवर अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर पवार कुटुंबियांनी गावभाग हा आमचा बालेकिल्ला असल्याचे सांगत पाटील यांच्यावर प्रचंड टीका केली. त्यानंतर गावभागातील मतदारांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण प्रत्यक्षात गावभागातही संजय पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. याठिकाणच्या एकूण ११ मतदान केंद्रांवर संजय पाटील यांना ५८७९, तर प्रतीक पाटील यांना १ हजार ४६१ इतकी मते मिळाली. संभाजी पवारांच्या विरोधानंतरही गावभागाने भाजपच्या अधिकृत उमेदवाराला साथ दिली. संभाजी पवारांचे निवासस्थान ज्या परिसरात आहे, त्या ईदगाह परिसर, जुना बुधगाव रस्ता व गुजराती हायस्कूल परिसरातही संजय पाटील यांना मताधिक्य लाभले आहे. मोदी लाटेबरोबरच नेत्यांबद्दलची नाराजीही लोकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच हक्काच्या परिसरातही प्रतीक पाटील यांना मताधिक्य मिळू शकले नाही. (प्रतिनिधी)
घरच्या मैदानावरही अपयश सांगली लोकसभा : वसंतदादा कारखाना परिसरात प्रतीक पाटील यांचे मताधिक्य घटले
By admin | Published: May 19, 2014 12:25 AM