सांगली : मिरज मतदारसंघात आजवरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर असतानाही येथील जागेबाबत काँग्रेस नेत्यांनी उदासीनता दाखविल्याचे चित्र आहे. गेल्या दहा वर्षांपासून मिरजेची जागा मित्रपक्षाला सोडण्याचा पायंडा काँग्रेसने पाडल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.मिरज मतदारसंघाची जागा यंदा महाविकास आघाडीतून उद्धवसेनेला देण्यात आली आहे. याठिकाणी त्यांनी तानाजी सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. सातपुते यांनी २०१४ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना चौथ्या क्रमांकाची १० टक्के म्हणजेच २० हजार मते मिळाली होती. सुरेश खाडे यांनी या निवडणुकीत ५० टक्के मते मिळवित विजय नाेंदविला होता.या मतदारसंघावर काँग्रेसचा दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस येथील दावेदारी मजबूत करेल, असे वाटत असतानाच ही जागा उद्धवसेनेला सोडण्यात आली. मुत्सद्देगिरीत काँग्रेस कमी पडल्याने जिल्ह्यातील आठपैकी केवळ ३ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने चार जागा पदरात पाडून घेतल्या.
शिवसेने चारवेळा निवडणूक लढली..मिरज मतदारसंघातील आजवरच्या एकाही निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालेले नाही. आजवर चारवेळा शिवसेना उमेदवारांनी निवडणूक लढविली. दोनवेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, पण विजय पदरात पडू शकला नाही.
काँग्रेसचा स्ट्राईक रेट ५४ टक्केमिरज मतदारसंघामध्ये आजवर झालेल्या एकूण १३ निवडणुकांमध्ये सात निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट ५४ टक्के इतका आहे. त्याखालोखाल भाजपचा २३ टक्के, जनता दलाचा १५ टक्के व इतरांचा ८ टक्के आहे.
लोकसभेला मिरजेत २५ हजारांचे मताधिक्यनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून २५ हजार ८१ मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभेला काँग्रेस येथे मजबूत दावेदारी करणार, असे कार्यकर्त्यांना वाटत होते, मात्र काँग्रेसने सहजपणे दावेदारी सोडून दिली.
कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांत नाराजीकाँग्रेसच्या वाट्याची जागा उद्धवसेनेकडे गेल्याने मिरज मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. या मतदारसंघातून पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारीही इच्छुक होते.
काँग्रेसचे आजवरचे विजयी उमेदवार असेउमेदवार - वर्ष
- गुंडू पाटील - १९६२, १९६७
- मोहनराव शिंदे - १९७८, १९८०, १९८५
- हाफिज धत्तुरे - १९९९, २००४