लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माजी खासदार लक्ष्मणतात्या पाटील यांचे कृष्णा नगर येथील निवासस्थान आजही ‘खासदार बंगला’ म्हणून ओळखला जातो. अशा या बंगल्यात सोमवारी झालेल्या स्नेहभोजन मेळाव्यात जणू आगामी लोकसभा निवडणूकीचीच चाचपणी झाली. राष्ट्रवादीचा भावी उमेदवार कोण, याची नांदी याठिकाणी कार्यकर्त्यांना पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले अन् राष्ट्रवादीचे इतर नेते यांच्यातील कलगी तुरा सर्वसामान्य सातारकरांसाठी ‘फुल्ल टाईम पास’ म्हणून चर्चीला जात असला तरी यामुळे पक्षाला हानी पोहोचू शकते, हे ओळखून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या पाच दिवसांतील दौऱ्यात बहुतांश नेत्यांची भेट घेतली. वरकरणी जरी पवारांचा हा खासगी दौरा असला तरी ज्या पद्धतीने स्थानिक नेते त्यांना रोज भेटत होते, चर्चा करीत होते, हे पाहता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो, याचीही चुणूक पाहावयास मिळाली. लोकसभेचे आगामी उमेदवार रामराजे नाईक-निंबाळकरच असतील, अशी जाहीर घोषणा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली असली तरी ऐनवेळी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे किंवा वाईचे आमदार मकरंदआबा पाटील हेही असू शकतात.राजेंना शह देण्यासाठी केवळ राजेच...उदयनराजे भोसले यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही कधी केली नसेल एवढ्या जहाल पद्धतीने रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आजपर्यंत टीका केली आहे. त्यामुळे उदयनराजेंना शह केवळ फलटणचे रामराजेच देऊ शकतात. अशातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांच्याच बंधूकडे असल्याने अन् साताऱ्यातून शिवेंद्रराजेंचे चांगलेच पाठबळ मिळाल्याने रामराजेच लोकसभेचे उमेदवार असू शकतात.
खासदार बंगल्यात लोकसभेची नांदी
By admin | Published: May 09, 2017 11:30 PM