सांगली : पलूस-कडेगाव मतदारसंघात सध्या मी लक्ष दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकच लढविण्याचा विचार असून, कोणी कितीही चर्चा केली तरीही, लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे स्पष्ट मत युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्या तरी मी लोकसभेचा विचार करीत नाही. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस-कडेगाव मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आली आहे. येथील जनतेला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये याची दक्षता मी घेणार आहे.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचाच सध्या विचार आहे. लोकसभा अजिबात लढविणार नाही. तशी चर्चा केली जात असली तरी, त्याला अर्थ नाही. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत कधीच विचार केला नाही. काँग्रेसकडे लोकसभेसाठी सक्षम उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने आणि समन्वयाने लढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीतील पराभवाने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. महापालिका निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्टÑवादी-काँग्रेसच्या आघाडीबाबतचा निर्णय हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळे त्याबाबत आम्ही कोणतेही मत व्यक्त करणे उचित नाही. महापालिका निवडणुकीत आघाडी करताना काही ठिकाणी नाईलाजास्तव मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय काढला, पण तो तोट्याचा ठरला. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी भविष्यात टाळता येऊ शकतात.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्दिष्टकदम म्हणाले, भाजपसारख्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे हे उद्दिष्ट असल्याने, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे वरिष्ठ तसेच स्थानिक नेते एकवटतील. सर्वांनी पूर्ण ताकद लावल्यास भाजपला याठिकाणी यश मिळणार नाही. विधानसभा मतदारसंघ लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, आगामी सर्व निवडणुकांसाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सक्रिय राहीन. जास्तीत जास्त काँग्रेस उमेदवार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कसे विजयी होतील, यासाठी प्रयत्न केले जातील.