सांगली : माणूस ज्या स्थानावर पोहोचतो ते त्याच्यामुळे नव्हेतर त्याच्या आचरणामुळे पोहोचत असतो. देश हितासाठी कार्य करताना नेहमीच हीच भावना ठेवून लोकमान्य टिळकांनी त्या काळात काम केले. त्यांच्या याच विचारधारेचा आदर्श घेऊन देशहितासाठी प्राधान्य दिले गेले. टिळकांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात. त्यामुळेच लोकमान्य टिळक हेच राष्ट्राचे अमर असे आदर्श आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी सांगलीत केले.
येथील लो. टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यास डॉ. भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले की, कोणतेही उद्दीष्ट मनात ठेवून कार्य केल्यास ती ध्येयप्राप्ती ही होतच असते. टिळकांचेही व्यक्तीमत्त्व असेच होते. त्यामुळे टिळकांचे देशहिताचे विचार तेव्हाही आणि आताही प्रेरणादायीच आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करतानाही डॉ. हेडगेवार यांच्यासमोर टिळकांचे विचार आदर्श होते. त्यांच्या आचरणातून शिकायला मिळाले असल्यानेही संघानेही देशहितासाठी कार्य केले. टिळकांनी स्वत:चा विचार न करता रूजवलेले विचार महत्वाचे होते. टिळकांचा काळ हा वेगळा असलातरी गुणसंपदेवर त्यांनी तो सार्थकी करून दाखविला होता. म्हणूनच त्यांचे विचार हे राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक आहेत. माणूस कधीही जूना होत नाही हेच यातून लक्षात येते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, स्मारक मंदिरच्या अध्यक्ष मनीषा काळे, प्रकाश बिरजे, विनायक काळे, श्रीहरी दाते, माणिकराव जाधव, माधव बापट, प्रकाश आपटे, सौरभ गोखले, अमृता गोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.