कोरोनामुळे प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी एरवी चोवीस तास गजबजणाऱ्या मिरज स्थानकात रेल्वे जाताच असा शुकशुकाट असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अजूनही गर्दी आहे. मुंबई-पुण्याला जाणाऱ्या गाड्यांची आरक्षणे फुल्ल असून, परतीच्या गाड्या मात्र रिकाम्या धावताहेत. कर्नाटकसह दक्षिणेत जाणाऱ्या गाड्यांनाही प्रवासी नाहीत.
लॉकडाऊनमुळे सध्या मिरज, सांगलीतून अवघ्या ११ गाड्याच धावताहेत. पॅसेंजर गाड्या पूर्ण बंद आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय प्रवेश नाही. स्थानकात फक्त आरक्षण कक्ष सुरू आहे, त्याशिवाय ऑनलाईनद्वारेही आरक्षणाच्या तिकिटांची विक्री सुरू आहे. देशातील अनेक शहरांत कोरोनाचा उद्रेक पुन्हा होत आहे. ऐनवेळेस लॉकडाऊन लागू केले जात आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे एप्रिल, मे किंवा जूनमधील आरक्षण करून ठेवण्याचे धाडस प्रवासी करत नाहीत. काहींनी आरक्षणे केली आहेत, पण ऐनवेळी ती रद्द करावी लागू शकतील, अशी मानसिकताही तयार केली आहे.
विदर्भात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने गोंदीयाकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस बऱ्यापैकी रिकामी धावत आहे. पुण्यानंतर काही प्रमाणात गर्दी होते. मुंबईला जाणाऱ्या गाड्या फुल्ल आहेत, पण परतताना रिकाम्या येताहेत. हुबळी-दादर ही गाडी जाता-येता रिकामीच धावत आहे. कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांनाही सांगली-मिरजेतून फारसे प्रवासी नाहीत. प्रवाशांच्या मनात ऐनवेळच्या लॉकडाऊनची भीती घर करून आहे.
चौकट
दररोज ११ रेल्वे
सध्या मिरज स्थानकातून दररोज रेल्वे धावताहेत. यामध्ये गोवा, निजामुद्दीन, हुबळी, दादर, जोधपूर, अजमेर, म्हैसूर, मुंबई, गोंदीया, तिरुपती, तिरुनरवेल्ली, पुद्दुचेरी आदींचा समावेश आहे. मुंबईला जाण्यासाठी महालक्ष्मी, कोयना, हुबळी-दादर या गाड्या उपलब्ध आहेत. उत्तरेकडे जाण्यासाठी जोधपूर, अजमेर, गांधीधाम, संपर्कक्रांती, निजामुद्दीन या एक्स्प्रेस धावताहेत. त्याशिवाय तिरुपतीसाठी हरिप्रिया एक्स्प्रेस, गोंदीयासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस उपलब्ध आहे. हुबळी-कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस सध्या दादरपर्यंत वाढविली आहे. पंढरपूर, सोलापूरकडे जाण्यासाठी मात्र गाड्या नाहीत. कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी एक्स्प्रेस ही एकमेव साप्ताहिक गाडी पंढरपूरपर्यंत उपलब्ध आहे. कोल्हापूर-निजामुद्दीन ही साप्ताहिक गाडी कोल्हापुरातून दिल्लीला जाण्यासाठी धावत आहे.
चौकट
परीक्षेनंतर हाऊसफुल्लची शक्यता
सध्या दहावी-बारावीसह विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. त्या संपताच मे महिन्यात बहुतांश गाड्या हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लोकांना गावाकडे स्थलांतराचे वेध लागले आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे ती मुलांच्या परीक्षा संपण्याची. त्यामुळे मे महिन्यात उत्तरेकडील गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
चौकट
जोधपूर, अजमेर, दिल्लीसाठी वेटिंग
उत्तरकेडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आतापासूनच वेटिंग आहे. विशेषत: जोधपूर, अजमेर, गांधीनगर, दिल्ली या गाड्यांना प्रतीक्षायादी दिसून येते. तिरुपती, गोंदीया, कोल्हापूर-धनबाद, कोल्हापूर निजामुद्दीन या गाड्यांना फारशी गर्दी नाही. काही गाड्यांमध्ये पुण्यापासून पुढे वेटिंग आहे. वेटिंग तिकिटांद्वारे प्रवासाला परवानगी नाही, त्यामुळे रेल्वेतर्फे प्रतीक्षायादी दिली जात नाही. तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवास करता येतो.
कोट
सध्या मिरजेतून मोजक्याच गाड्या धावताहेत. कोरोनामुळे प्रवासीही जेमतेम आहेत. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यानंतर गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे. दररोज सरासरी अडीचशे तिकिटांचे आरक्षण मिरजेतून होते.
- व्ही पन्नीरसेल्वम, स्थानक अधीक्षक, मिरज.