जयवंत आदाटे- जत -शासनाने जत तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. मका पिकाचा हमीभाव एक हजार तीनशे दहा रुपये आहे. परंतु व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून एक हजार पन्नास किंवा एक हजार एकशे पन्नास रुपये दराने मका खरेदी करीत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रति क्विंटलमागे १६० ते २६० रुपये इतकी आर्थिक पिळवणूक होत आहे.कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही व चार महिन्यात हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे जत तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस आकर्षित होऊ लागला आहे. सुमारे तीस हजार एकर क्षेत्रावर तालुक्यात मका पिकाची लागण झाली आहे, अशी नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आहे. सरासरी प्रति एकर चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. मका पीक पेरणी बैलजोडी अथवा ट्रॅक्टरने केल्यानंतर त्याची संपूर्ण मळणी मळणीयंत्र अथवा नव्याने बाजारात आलेल्या आधुनिक मळणी यंत्राद्वारे केली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेतमजूर लागत नाहीत. त्यामुळे कमी खर्चात जादा उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे येथील शेतकरी आकर्षित होत आहेत.शासनाने मका पिकाचा हमीभाव प्रतिक्विंटल १ हजार ३१० रुपये इतका जाहीर केला आहे. जत शहर अथवा तालुक्यात इतरत्र कोठेही मका खरेदी केंद्र सुरू नाही. शासनाचे चुकीचे धोरण व निसर्गाची अवकृपा आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे येथील शेतकरी नेहमी आर्थिक संकटात असतो. मळणी झाल्यानंतर मका शेतकरी विक्रीसाठी आणतात. शासनाचा हमीभाव काय आहे आणि व्यापारी किती दर देणार आहेत, याची फारशी चौकशी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. याचाच गैरफायदा या व्यवसायातील दलाल आणि व्यापारी घेत आहेत. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा मका हमी भावापेक्षा २६० ते १६० रुपये कमी दराने खरेदी करून, त्याची जादा दराने इतरत्र विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी भिकेकंगाल आणि व्यापारी व दलाल मालामाल, अशी अवस्था येथे निर्माण झाली आहे. मका पीक चार महिन्यात येते. मळणी झाल्यानंतर ठेवण्यासाठी योग्य ठिकाण नाही व आर्थिक अडचण यामुळे, जो दर व्यापारी देईल, त्या दराने शेतकरी मका विकण्यास तयार होतो. प्रशासन व्यापाऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू करत नाही. त्यामुळे काहीवेळा विनंती करून शेतकरी व्यापाऱ्यांना मका खरेदी करण्यास तयार करीत आहेत. त्याचा गैरफायदा काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. शासनाने हमीभाव मिळवून देण्यासाठी तालुक्यातील उमदी, संख, माडग्याळ, बिळूर, डफळापूर, शेगाव याठिकाणी मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक तूट कमी करावी, अशी मागणी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.दोन वर्षापासून मका पिकाचा हमीभाव १ हजार ३१० रुपये असा एकच आहे. या दोन वर्षात खते, बियाणे, वीज बिल, शेतमजुरांचे पगार यामध्ये भरमसाट वाढ झाली आहे. परंतु हमी भावामध्ये कोणतीही वाढ झाली नाही. शासनाने यामध्ये वाढ करावी, अशी मागणी तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे. १ जानेवारी २०१५ पासून जत तालुका देखरेख संघाच्यावतीने व दुय्यम बाजार आवार जत यांच्या नियंत्रणाखाली तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी तोंडी माहिती सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे. त्यासंदर्भात कोणतेही लेखी आदेश नाहीत, अशी माहिती जत बाजार समितीचे सचिव विजयसिंह राजेशिर्के यांनी दिली.शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदाशासनाने मका पिकाचा हमीभाव प्रतिक्विंटल १ हजार ३१० रुपये इतका जाहीर केला आहे. शासनाचा हमीभाव काय आहे आणि व्यापारी किती दर देणार आहेत, याची फारशी चौकशी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. याचाच गैरफायदा या व्यवसायातील दलाल आणि व्यापारी घेत आहेत. हमी भावापेक्षा २६० ते १६० रुपये कमी दराने खरेदी करून, त्याची जादा दराने इतरत्र विक्री केली जात आहे. प्रशासन व्यापाऱ्यांसाठी मका खरेदी केंद्र सुरू करत नाही. त्यामुळे आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी काहीवेळा विनंती करून शेतकरी व्यापाऱ्यांना मका खरेदी करण्यास तयार करीत आहेत. त्याचाच गैरफायदा काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे.
खरेदी केंद्राअभावी मका उत्पादकांची लूट
By admin | Published: December 16, 2014 10:30 PM