दहिवडी : शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुद्ध एकादशीला इंदोर राजघराण्याचे वारस कालगौडा राजे यांनी रीतिरिवाजाप्रमाने घोड्यावर बसून येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. या राजांचा चैत्र शुद्ध एकादशीला चप्पल घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याचा मान आहे. त्यानुसार त्यांनी दर्शन घेतले. डोंगरावर लाखो भाविक दाखल होऊ लागले असून, ‘हर हर महादेवऽऽऽ’ च्या गर्जनेने डोंगर दुमदुमत आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. यानिमित्त पंधरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडला. आख्यायिकेनुसार या विवाह सोहळ्याला त्याकाळी इंदोरच्या राजाला लग्नाचे निमंत्रण दिले गेले नव्हते. म्हणून एकादशी दिवशी येऊन देवाचा निषेध केला होता आणि आत्तापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार कालगौडा राजे हे त्यांचे वंशज घोड्यावरून चप्पल घालून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन भक्तिरूपी निषेध करतात. कालगौडा राजांनी शुक्रवारी सकाळी पुष्कर तलावात स्नान केले. त्यानंतर न्याहारी केली. सर्व शिवभक्त एकादशी निमित्त उपवास करतात. मात्र, ते न्याहरी करतात. त्यानंतर कालगौडा राजांनी पारंपरिक पद्धतीने घोड्यावरून येऊन दर्शन घेतले. त्यानंतर उमाबनातील झाडाखाली बसून कांदा, चटणी आणि भाकरी खाल्ली. त्यांच्याबरोबर आलेल्या भाविकांनीही महाप्रसाद घेतला. (प्रतिनिधी)कावडी दाखलशंभू महादेवाच्या दर्शनासाठी एकादशी निमित्त सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतून शेकडो भाविक दाखल झाले आहेत. तसेच विविध भागांतून मानाच्या कावडी शिखर शिंगणापूरकडे येत आहेत. त्यामुळे या गर्दीतून कालगौडा राजे व त्यांच्या सहकाऱ्यांना मार्ग काढणे अवघड जात होते.
इंदोरचे वारस महादेवाच्या भेटीला
By admin | Published: April 07, 2017 10:48 PM