कडेगाव : कडेपूर (ता. कडेगाव) येथे हर्ष पॉलिमर्स या कंपनीच्या कारखान्यातील गोदामाला बुधवार दि. २७ रोजी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी, कारखान्यातील गोदामामधील पॉलिमर्स बारदान जळून बेचिराख झाल्याने ११ कोटी ७० लाख ९३ हजार ६४३ रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.कडेपूर येथे कऱ्हाड -विटा रस्त्यापासून जवळच नेताजीराव यादव यांच्या मालकीच्या हर्ष पॉलिमर्स या कंपनीचा पॉलिमर्स बारदानाचे उत्पादन करणारा कारखाना आहे. बुधवारी पहाटे कारखान्यातील गोदामाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
कामगारांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आग आटोक्यात आली नाही. आगीचा जोर मोठा असल्याने कच्चा माल व पक्का माल जळून खाक झाला. तसेच गोदामाचेही नुकसान झाले.या आगीत सुमारे ११ कोटी ७० लाख ९३ हजार ६४३ रुपयांचे नुकसान झाले. सोनहिरा कारखाना व कऱ्हाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली. याबाबत कंपनीतील कामगार धैर्यशील सुरेश पाटील यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलीस फौजदार जालिंदर जाधव अधिक तपास करीत आहेत.