सांगली : व्याजाने दिलेल्या पाच लाखांच्या मुद्दल आणि व्याज वसुलीसाठी सावकार दाम्पत्याने दुधगाव (ता. मिरज) येथील फरियान जावेद तांबोळी या महिलेचा २५ लाखांचा प्लॉट हडप केल्याचा प्रकार आज, शनिवार रात्री उघडकीस आला. याप्रकरणी या सावकार दाम्पत्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास आप्पा कोळी व सुनीता विश्वास कोळी (रा. दुधगाव) असे या दाम्पत्याचे नाव आहे.फरियान तांबोळी पती व मुलांसोबत दुधगावमध्ये राहतात. कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे त्यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये विश्वास कोळी याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजाने पाच लाख रुपये घेतले होते. प्रत्येक महिन्याला त्या ५० हजार रुपये व्याज देत होत्या. मार्च २०१३ नंतर दोन महिन्यांचा व्याजाचा हप्ता त्यांना देता आला नाही. त्यामुळे कोळीने वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र तांबोळी यांना व्याजाचे हप्ते देता आले नाहीत. त्यामुळे कोळीने तांबोळी यांचा दुधगावमधील सिटी सर्व्हे ५१२ मधील २५३.७ चौरस मीटर प्लॉट नोटरी करून देण्यासाठी तगादा लावला होता. त्यानुसार तांबोळी यांनी हा प्लॉट नोटरी करून दिला होता.प्लॉटची कागदपत्रे मिळाल्यानंतर कोळीने तांबोळी यांच्याकडून बँकेचे पाच कोरे धनादेश व कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या. नोटरी केलेला प्लॉट पत्नी सुनीता हिच्या नावावर खुशखरेदी करून देण्यास सांगितले. १९ जून २०१३ रोजी तांबोळी यांनी सांगलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात येऊन सुनीता यांच्या नावावर हा प्लॉट खुशखरेदी करून दिला. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या प्लॉटची किंमत २५ लाख रुपये आहे. प्लॉट हडप करूनही कोळी व्याज व मुद्दल परत देण्यासाठी धमकावत होता. त्यामुळे आज सायंकाळी तांबोळी यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
सावकाराने लाटला २५ लाखांचा प्लॉट
By admin | Published: January 04, 2015 12:55 AM