सांगली : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंबा सामान्यांच्या आवाक्यात आला असून, भरपूर आमरस खाण्यास मिळणार आहे. केशर, हापूस, पायरी यांना मागणी वाढली आहे. लॉकडाऊन काळात वितरणास अडचणी येत असल्या तरी घरपोच सोय होत असल्याने आंबाप्रेमींना दिलासा मिळाला आहे.
अक्षय्य तृतीयेला आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. याच दिवशी आमरसही केला जातो. त्यामुळे अक्षय्य तृतीया जवळ आली की आंब्यांची मागणी वाढते. मागणी वाढल्याने या काळात दरही वाढत असतात. मात्र यंदा दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे भरपूर आमरस खाण्याचा बेत आखला जाऊ शकतो. येत्या शुक्रवारी १४ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. दोनच दिवसांवर सण येऊन ठेपल्याने आंबा मागविण्यात येत आहे. घरपोहोच सेवा देणाऱ्यांकडून आंबा पोहोच केला जात आहे. कडक लॉकडाऊनमुळे बाजारात जाऊन चार ठिकाणी चौकशी करून आंबा खरेदीची संधी यंदा नागरिकांना नाही. त्यामुळे मिळेल तो आंबा गोड मानून खावा लागण्याचीही शक्यता आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही या वेळी अपेक्षित दर मिळत आहे. निर्यातक्षम केशर आंब्याला १३५ रुपये दर मिळाला आहे.
कोट
या वेळी निर्यातीला चांगली संधी मिळाली. स्थानिक बाजारपेठेतही मालाला मागणी आहे. ज्यांचा माल वेळेत बाजारात आला त्यांना चांगला दर मिळाला, मात्र उशिरा आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळाला नाही.
- विराज कोकणे, आंबा उत्पादक
कोट
लॉकडाऊनमुळे आंबा उत्पादकांसमोर अनेक अडचणी येत आहेत. कामगारांना तोडणीसाठी येता येत नाही. शेतकऱ्यांनाही घर व शेतीपर्यंतचा प्रवास करता येत नसल्याने बाजारात माल येण्यास विलंब होत आहे.
- विकास बेडकीहाळ, आंबा उत्पादक
कोट
या वेळी आंबा सामान्यांच्या आवाक्यात असल्याने मागणी आहे. अक्षय्य तृतीयेमुळे मागणी वाढली आहे. ज्यांना घरपोहोच करणे शक्य आहे ते सेवा देत आहेत. बाजारातील प्रत्यक्ष विक्री बंदचा मोठा परिणाम दिसत आहे.
- मुसाभाई सय्यद, फळ विक्रेते
कोट
प्रत्यक्ष किंवा काही वेळासाठी विक्रीसाठी परवानगी मिळणे अपेक्षित होते. सध्या आंब्याला मागणी वाढत असली तरी विक्रीला मोठ्या अडचणी आहेत.
- शरद चव्हाण, विक्रेते
चौकट
आंब्याची किरकोळ विक्री प्रति डझन
रत्नागिरी हापूस ५०० ते ५५०
कर्नाटकी हापूस १५० ते २००
पायरी ३५० ते ४००
केशर ३०० ते ३५०
मद्रास पायरी १५० ते २००
लालबाग आंबा १०० ते १२५
चौकट
आवक वाढली, ग्राहक रोडावले
अक्षय्य तृतीयेमुळे आंब्याची बाजारातील आवक वाढली आहे. सर्व प्रकारचे आंबे बाजारात दाखल होत असताना ग्राहक रोडावले आहेत. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. या काळात नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे आंबा खरेदीसाठी एरवी होणारी लगबग आता दिसत नाही. त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढीच खरेदी करण्याकडे किरकोळ विक्रेत्यांचा कल आहे.