कवठेमहांकाळ : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे आणि माझे नाते राजकारणापलीकडचे आहे. घरात आलेल्या अतिथीचा पाहुणचार करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आ. पाटील आणि माझ्या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. तसेच मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नाही. माझ्या हातात कमळच आहे, असे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
रविवारी राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कवठेमहांकाळ येथे विजयराव सगरे यांच्या कन्येच्या लग्नसमारंभासाठी आले होते. यावेळी अजितराव घोरपडे यांनी त्यांच्या कार्यालयात आ. पाटील यांना नेले. त्या ठिकाणी आ. पाटील यांचा सत्कार केला. या भेटीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते.‘लोकमत’शी सोमवारी मुंबईतून अजितराव घोरपडे यांनी संपर्क साधून आ. पाटील यांची सदिच्छा भेट घेतल्याचे स्पष्ट केले. घोरपडे म्हणाले, जनतेसाठी विकास कामे करणे हे माझे उद्दिष्ट आहे. ते मी जनतेशी प्रामाणिक राहून करीत आहे. काही वेळेला राजकीय अपरिहार्यतेमुळे निर्णय घ्यावे लागतात. भविष्यात आपण जनतेच्या विकास कामासाठी योग्य निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.जयंतरावांशी राजकारणापलीकडचे संबंधराष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असे विचारल्यानंतर घोरपडे म्हणाले, असे काही नाही. आ. जयंत पाटील हे आपल्या जिल्ह्यातील नेते आहेत. त्यांना मोठी संधी मिळाली आहे. ते माझ्या मतदारसंघात आले. त्यामुळे त्यांचा मी सत्कार केला. जयंत पाटील यांच्याशी माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत. ही राजकीय भेट नसून, घरगुती भेट होती. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेण्याची गरज नाही.