सांगली : गेल्या वर्षी जिल्ह्यात लम्मीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावली होती. लसीकरणामुळे हा संसर्गजन्य आजार आटोक्यात आला होता. मात्र, आता जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा शिरकाव झालेला असून, सध्या एक हजार २८९ जनावरांना 'लम्पी' बाधित आहेत. तसेच १०५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लम्पी आजार आटोक्यात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरु केले आहे.वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात सर्वाधिक लम्पी बाधित जनावरांची संख्या आहे. एप्रिल २०२३ ते आजअखेर दोन हजार ७५ जनावरं बाधित आहेत. त्यापैकी ६९१ जनावरं बरी झाली. रविवारी एका दिवसांत तब्बल २७७ जनावरं बाधित झाली आहेत. सध्या एक हजार २८९ जनावरं बाधित आहेत. बाधित जनावरांपैकी १०५ जनावरे दगावली आहेत. यामध्ये गाय ४६, बैल १५ आणि ४४ वासरांचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन लाख २४ हजार गायवर्गीय जनावरांपैकी दोन लाख ११ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.पशुपालकांनी ही काळजी घ्यावीनिरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे, गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये, रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले.
सांगली जिल्ह्यात पुन्हा 'लम्पी'चा शिरकाव, १२८९ जनावरे बाधित; पशुसंवर्धन विभाग सतर्क
By अशोक डोंबाळे | Published: August 21, 2023 7:00 PM