सांगली : पुणे येथील व्यापाऱ्याला कमी दरात सोने देण्याचे आमिष दाखवून आठ जणांच्या टोळीने २५ लाखांना लुटले. येथील कोल्हापूर रस्त्यावरील फळ मार्केटसमोर मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यानंतर पुण्याकडे पसार झालेल्या लुटारूंना पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून १५ लाखांची मोटार व लुटलेल्या रकमेतील साडेबारा लाख असा २७ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला.मानसी सुरेश शिंदे (वय ३०, मूळ रा. सारोळा, सध्या रा. कोथरुड, पुणे), प्रशांत भुजंगराव निंबाळकर (४८ रा. नांदुरा, जि. बुलढाणा), प्रवीण महादेव खिराडे (३७, रा. तायडे कॉलनी, खामगाव, जि. बुलढाणा) आणि नम्रता शरद शिंदे (२८, रा. पुणे) यांचा समावेश आहे. याप्रकरणी मयूर सुभाष जैन (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोतीबाग, शिवाजीनगर, पुणे) यांनी अशोक रेड्डी याच्यासह अन्य संशयिताविरोधात सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.फिर्यादी जैन यांचा पुण्यात स्टील-सिमेंटचा व्यवसाय आहे. त्यांचा मित्र असलेल्या सचिन काळभोर याला संशयित रेड्डीने कमी दरात सोने हवे असल्यास संपर्क साधण्यास सांगितले होते. काळभोरने जैन यांना सांगितल्यानंतर सोने घेण्यासाठी रेड्डी याला पुण्यात बोलाविले होते. परंतु सध्या आषाढी वारी सुरू असल्याने गर्दीचे कारण देत, रेड्डी आणि त्याच्या साथीदारांनी पुण्यात येणे टाळले. अखेर २० जून रोजी सांगलीतील फळ मार्केटजवळ भेटायचे निश्चित झाले.त्यानुसार, जैन यांच्यासह त्यांचे तीन मित्र सांगलीत फळमार्केटजवळ आले. त्यांच्या मोटारीपासून दूर असलेल्या मोटारीकडे संशयितांनी जैन यांना नेले. त्या मोटारीतील तिघांनी त्यांना सोन्यासारखी दिसणारी बिस्किटे दाखविली. पैसे देऊन बिस्किटे घेऊन जाण्यास सांगितले. जैन त्यांच्या मोटारीतून पैशाची पिशवी घेऊन जात असताना, दोघे जण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले व त्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत २५ लाख रुपये घेऊन ते पसार झाले. या दरम्यान, रेड्डी याने सोने घेण्यासाठी थांबण्यास सांगितले, मात्र सोने न मिळाल्याने जैन यांनी फिर्याद दाखल केली.टोलनाक्यावर पकडले
जैन यांना लुटल्यानंतर संशयित पुण्याच्या दिशेने चालले होते. याबाबतची माहिती साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळताच त्यांनी भुईंज आणि आनेवाडी टोल नाक्याजवळ बंदोबस्त लावण्याचे आदेश दिले. भुईंज पोलिसांनी तेथे संशयितांना ताब्यात घेतले.
फिर्यादी जैन यांच्याशी संपर्क साधून सोने देण्याचे आमिष दाखविणारा व नंतर पसार झालेल्या संशयित अशोक रेड्डी याचा शोध सुरू आहे. भुईंजजवळ पकडलेल्या संशयितांकडून साडेबारा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. उर्वरित रक्कम पसार झालेल्या रेड्डी आणि त्यांच्या साथीदारांजवळ असण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.