आटपाडी : इस्रायलला शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जाण्याच्या आमिषाने पुण्यातील ‘ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट’ संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात या संस्थेच्या महेश भाऊसाहेब कडूस-पाटील (वय ३७, रा. बिजलीनगर, चिंचवड, पुणे) याच्याविरोधात नानासाहेब ऊर्फ अण्णा दादा गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.राज्यातील अनेक शेतकरी गट गेल्या काही वर्षांत एकत्रित जोडले गेले आहेत. सांगोला तालुक्यातील गौडवाडीचे पाच ते सहा शेतकरी डाळिंब शेती करत आहेत. त्यांच्या काही शेतकरी मित्रांनी इस्रायल दौरा काढण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या पुणे येथील ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट संस्थेशी संपर्क साधला. सांगोला, अहमदनगर, टेंभूर्णी, पुणे, विटा, माळशिरस येथील ३२ शेतकऱ्यांच्या गटाने दौऱ्यासाठी सहमती दाखवली. प्रत्येकी सुमारे एक लाख ६० हजार रुपयांमध्ये इस्रायलचा सहा दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.९ मे २०२२ रोजी संस्थेच्या बँक खात्यावर गौडवाडी येथील नानासाहेब माळी, कल्लाप्पा गडदे, नाना माळी यांनी प्रत्येकी एक लाख ६० हजार रुपये भरले. ३२ पैकी ३० शेतकऱ्यांनी एकूण ५१ लाख रुपये भरले. मात्र पुन्हा व्हिसा काढण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण सांगत दौरा पुढे ढकलल्याचे कडूस-पाटीलने सांगितले. त्यानंतर आजअखेर शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर नेले नाही. वारंवार खोटे आश्वासन देत तो पुढील तारीख सांगत होता. पैसे देण्यासही टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
Sangli: इस्रायलला शेतीच्या अभ्यास दौऱ्यास नेण्याचे आमिष, पुण्यातील संस्थेचा शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:39 PM