विटा : यंत्रमाग कारखान्यातील तयार कापड खरेदी करून विटा येथील किरण भालचंद्र घुले (वय ४४, रा. मायणी रोड, विटा) या यंत्रमागधारकाची ६२ लाख १३ हजार ६०८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई येथील कापड व्यापारी राकेश बन्सल (धानुका) याच्याविरुध्द मंगळवारी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
विटा येथील किरण घुले यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. २०१६ मध्ये पाटण येथील कापड दलाल तानाजी पाटील यांच्या ओळखीने मुंबईतील राकेश बन्सल (धानुका) या कापड खरेदी करणाºया व्यापाºयाची ओळख झाली. तेव्हापासून यंत्रमागधारक घुले हे राकेश बन्सल (धानुका) यास कापड विक्री करीत होते. व्यापारी राकेश हा खरेदी केलेल्या कापडाचे पैसेही धनादेशाद्वारे देत होता. त्यामुळे त्याच्यावर घुले यांचा विश्वास बसल्यानंतर त्यांनी २२ नोव्हेंबर २०१६ ते २० एप्रिल २०१७ या कालावधित राकेश याला ९४ लाख ६३ हजार ६०८ रुपयांची कापड विक्री केली. या रकमेपैकी राकेश याने ३१ जानेवारी २०१७ ते २० एप्रिल २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधित
धनादेशाद्वारे वेळोवेळी ३२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घुले यांना अदा केली. परंतु, उर्वरित ६२ लाख १३ हजार ६०८ रुपये देण्यास राकेश टाळाटाळ करू लागला. त्यामुळे यंत्रमागधारक घुले यांनी वारंवार त्याच्याकडे उर्वरित रकमेची मागणी केली. पण राकेश याने घुले यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. शिवाय पैसे आणण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर घुले यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे घुले यांनी, ६२ लाख १३ हजार ६०८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित कापड व्यापारी राकेश बन्सल (धानुका) याच्याविरुध्द मंगळवारी विटा पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी विटा पोलिसात नोंद झाली आहे.