सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 03:38 PM2019-09-21T15:38:42+5:302019-09-21T15:39:41+5:30
सांगली विधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णुअण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगली : सांगलीविधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णुअण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे रितसर उमेदवारी मागितली आहे. त्यातच जयश्रीताई पाटील या विधानसभेच्या रणांगणात उतरणार की नाही? अशी चर्चा सुरू झाली होती. पण मदनभाऊ गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जयश्रीताई पाटील यांची भेट घेत, विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. श्रीमती पाटील यांनीही त्याला हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. त्यामुळे मदनभाऊ गटाने आता जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांनी कडेगाव येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम यांची भेट घेतली. सांगलीतून जयश्रीताई पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, आम्ही जिवाचे रान करून त्यांना निवडून आणू, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आ. कदम यांनी, सांगलीच्या उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी द्यावी, या मागणीचे पत्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविले आहे.
यावेळी माजी महापौर हारूण शिकलगार, माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, नगरसेवक मनोज सरगर, संतोष पाटील, अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, वर्षा निंबाळकर, फिरोज पठाण, उमेश पाटील, प्रकाश मुळके, करण जामदार, करीम मेस्त्री, संजय कांबळे, अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे, दिलीप पाटील उपस्थित होते.