मिरज : मिरज मतदारसंघात मंत्री सुरेश खाडे यांच्याशी संघर्ष करणाऱ्या मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. पूर्व भागातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची खाडे यांच्याशी दिलजमाई झाल्याने काँग्रेस अडचणीत आली आहे.मिरज मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी भाजपचे सुरेश खाडे यांनी ६४ हजार मताधिक्याने विजय मिळविला. पाच वर्षांत मिरज तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत भाजपने मताधिक्य मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे.
भाजप विरुध्द मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाने अस्तित्व कायम ठेवले आहे. येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविले तरी, सलगरेसह काही ग्रामपंचायती काँग्रेसच्या मदन पाटील गटाच्या ताब्यात आहेत.
मात्र मदन पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, माजी सभापती खंडेराव जगताप, महावीर कागवाडे, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश कांबळे, गणेश देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांसोबत मिरजेत खाडे यांची बैठक होऊन विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला.मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत खाडे यांच्या संस्थेस शासनाची जमीन देण्याच्या निर्णयाविरुध्द, मतदार संघातील रस्ते व अन्य प्रश्नांबाबत आंदोलने केली होती. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
गत निवडणुकीत या मतदारसंघातील मालगाव, बेडग, म्हैसाळ, आरग, भोसे, कवलापूर या प्रमुख गावांसह ४९ पैकी ४८ गावांत खाडे यांनी मताधिक्क्य मिळविले होते. काँग्रेसमधील गटबाजी व तगडा उमेदवार नसल्याने गेल्या दहा वर्षांत भाजपच्या मतांमध्ये वाढ होत आहे. दोन दिवसात बैठक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते भाजपला पाठिंबा जाहीर करणार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातमिळवणीमुळे भाजपचे काठावरचे बहुमत असलेल्या मिरज पंचायत समितीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत.