सांगली/मिरज : कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी १९ जागांकरिता तब्बल ४६५ उमेदवारांनी ५३४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी मंत्री मदन पाटील, विशाल पाटील यांच्यासह २३२ जणांनी सोमवारी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. यामध्ये अर्धा डझन माजी संचालकांचाही समावेश आहे. यावेळी विक्रमी अर्ज दाखल झाले असून, जिल्हा बँकेनंतर बाजार समितीमध्ये वसंतदादा घराण्यातील मदन पाटील आणि विशाल पाटील यांच्यात लक्षवेधी लढत होणार आहे. बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांची मोठी गर्दी होती. प्रक्रिया गटातून मदन पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, इंद्रजित पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, खरी लढत मदन पाटील विरुध्द विशाल पाटील यांच्यातच होणार आहे. विशाल पाटील यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला आहे. सोसायटी गटातून रमेश बिराजदार, भानुदास पाटील, विठ्ठल कोळेकर, दीपक लोंढे, मोहन देशमुख, दिनकर पाटील, वसंतबापू गायकवाड, भारत डुबुले, संभाजी पाटील, तात्यासाहेब नलवडे, तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ, वसंतदादा दूध संघाचे संचालक नाना शिंदे, रामपूर-मल्हाळचे सरपंच मारुती पवार यांनी उमेदवारी दाखल केली. हमाल-तोलाईदार गटातून माजी सभापती बाळासाहेब बंडगर यांनी अर्ज भरला आहे. आर्थिक दुर्बल गटातून जतच्या डफळे साखर कारखान्याचे माजी संचालक सदाशिव माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत. मिरजेत अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची खलबते सुरू होती. कवठेमहांकाळ तालुक्यातील माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक तीन ते चार कार्यकर्त्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे घोरपडे यांची भूमिका हे दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. १९ जागांसाठी ४६५ उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. दि. ८ रोजी छाननी होणार असून, दि. २२ पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी सर्वाधिक १७८ उमेदवारी अर्ज आले आहेत. (प्रतिनिधी)
मदनभाऊ-विशाल पाटील पुन्हा आमने-सामने
By admin | Published: July 07, 2015 1:20 AM