योगेश नरूटे ।सांगली : दुष्काळी भागातील मेंढपाळांना आता आधुनिक पद्धतीने मेंढी पालनाचे नवे दालन सुरू होत आहे. मेंढ्यांच्या माडग्याळी जातीला मानांकन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आॅनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी जतमधील राजमाता माडग्याळ शीप ब्रिडर्स असोसिएशन ही संस्था प्रयत्नशील आहे.
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून या संस्थेस मार्गदर्शन केले जात आहे. या माध्यमातून आता माडग्याळी जातीच्या मेंढीला विशेष मानांकन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव नॅशनल ब्युरो आॅफ अॅनिमल जेनेटिक रिसर्च (एनबीएजीआर) या केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या संस्थेकडे अंतिम मंजुरीसाठी देण्यात आला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात होते. या भागातील माडग्याळी जातीच्या मेंढीचे मांस चविष्ट असल्याने बाजारपेठेत त्याला खूप मागणी आहे. या मेंढीची लोकरही उच्च दर्जाची आहे. राज्य आणि राज्याबाहेर या मेंढीच्या मांसाचा ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. ही चव आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मानांकन कशासाठी...राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकन असणाऱ्या वस्तूंना खरेदी व्यवहारात पाठबळ मिळत असते. मानांकनामुळे गुणवत्तेवर व त्या विशिष्ट जातीवर शिक्कामोर्तब होत असते. त्यामुळे बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते.आॅनलाईन मार्केटिंगमानांकनाचा टप्पा यशस्वी झाल्यानंतर मेंढ्यांची विक्री थेट आॅनलाईन होईल. यासाठी वेबसाईट तयार केली जाणार आहे. यामुळे मेंढपाळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर थेट मार्केट मिळविणे शक्य होईल. यासाठी राजमाता माडग्याळ शीप ब्रिडर्स असोसिएशन प्रयत्नशील असणार आहे.मानांकन मिळाल्यानंतर काय?मेंढपाळांना आधुनिक पद्धतीने मेंढीपालनाचे प्रशिक्षणआरोग्य सुविधा, लसीकरण व जंतनाशक औषधेदुष्काळात पाणी व चारा पुरवठागाव दत्तक योजनेतून मेंढपाळांना मार्गदर्शनभटकंती थांबवून बंदिस्त पद्धतीने मेंढीपालनाचे मार्गदर्शन
माडग्याळी जातीला मानांकन देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यास केंद्र सरकारच्या एनबीएजीआर विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. येत्या काळात या जातीच्या मेंढीपालनात आधुनिक तंत्र विकसित केले जाईल. यातून मेंढपाळांना फायदा होणार आहे.- डॉ. सचिन टेकाडे, सहायक संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे