सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट दुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यासाठी दुपारपर्यंत नेतेमंडळींचा खटाटोप सुरु होता.निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि स्थानिक विशाल पाटील गट असे जुगाड अखेर यशस्वी झाले. जयंत पाटील आणि विशाल पाटील यांची हातमिळवणी झाली. पॅनेलमध्ये कॉंग्रेसला ७ जागा, राष्ट्रवादीला ६ जागा आणि शिवसेनेला दोन जागा निश्चित करण्यात आल्या. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आणि विशाल पाटील यांनी ही घोषणा केली. भाजपची नेत्यांचीही सकाळी बैठक झाली. त्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटासह पॅनेल निश्चित करण्यात आले.महाविकास आघाडीमध्ये संग्राम पाटील, सांगलीवाडी, दादा पाटील, एरंडोली, शशिकांत नागे, आनंदराव नलवडे यांना पॅनेलमध्ये संधी मिळाली आहे. पॅनेलला वसंतदादा पाटील शेतकरी महाविकास आघाडी पॅनेल असे नाव देण्यात आले आहे. जत तालुक्याला ६, कवठेमहांकाळला ४ आणि मिरज तालुक्याला ५ जागांचा वाटप करण्यात आले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सावंत यांनी सांगितले की, पॅनेल म्हणून एकत्र लढत असल्याने एकाच चिन्हाची विनंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करणार आहोत. पॅनेलची धोरणे शेतकरी केंद्रीत आहेत. जाहिरनाम्यातही शेतकरी, निवास शेतमालालाला रास्त भाव आधी घोषणा करणार आहोत.यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक मनोज शिंदे - म्हैसाळकर, बाळासाहेब होनमोरे, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम आदी उपस्थित होते.दरम्यान, दोन्ही पॅनेलमध्ये गेल्यावेळच्या एकाची संचालकाचा समावेश नाही. अपात्र ठरलेल्या चार संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्याचा निर्णयही सायंकाळपर्यंत अपेक्षित होता. व्यापारी व हमाल गटातील चित्रही दुपारपर्यंत स्पष्ट झालेले नव्हते.
सांगली बाजार समितीसाठी 'मविआ' विरुद्ध 'भाजप' थेट लढत
By संतोष भिसे | Published: April 20, 2023 5:07 PM